शब्दांजली; असा शिस्तबद्ध कलावंत पुन्हा होणे नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2019 01:49 PM2019-12-18T13:49:26+5:302019-12-18T13:53:00+5:30
श्रीराम लागूंच्या जाण्याने सोलापूरकर हळहळले; साहित्यिक तसेच नाट्य कलावंतांनी व्यक्त केल्या भावना
सोलापूर : ज्येष्ठ नाट्य व सिनेअभिनेते डॉ़ श्रीराम लागू यांचे मंगळवारी रात्री निधन झाले़ त्यांच्या निधनानंतर येथील कलावंत तसेच कलाप्रेमी रसिकांनी शोक व्यक्त केला. डॉ. लागू हे सोलापूर आणि सोलापूरकरांशी विशेष आपुलकी राखून होते़ ते संयमी होते आणि संवेदनशीलही़ त्यांच्यासारखा शिस्तबद्ध अभिनेता पुन्हा होणे शक्य नाही, अशा भावना कलावंतांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केल्या.
नटसम्राट डॉ़ श्रीराम लागू हे जमिनीवरचे कलावंत होते़ ते सर्वसामान्य कलावंतांशीही आपुलकीने बोलायचे़ हुतात्मा स्मृती मंदिरातील गणपत मोरे नामक बॅक स्टेज कलावंतालाही ते खूप आपुलकीने बोलायचे़ त्याच्याशी संवाद साधायचे़ त्याच्या परिवाराची काळजी ते करत़ आणि त्याला डॉ़ लागूंनी आर्थिक मदतही केली़
-विजय साळुंके
अध्यक्ष : मराठी नाट्य परिषद, उपनगरीय शाखा, सोलापूर
डॉक्टर साहेबांनी केलेली कामे अजरामर आहेत़ त्यांचा नाटकाबद्दलचा दृष्टिकोन खूपच सकारात्मक होता़ नाटकांची निवड करतानादेखील ते खूप विचार करायचे़ त्यांचे पाठांतर आणि संवादशैलीदेखील अनोखी होती़ ते कलाप्रेमी होते़ कलेवर त्यांचे अपार प्रेम होते़ कलेशी त्यांनी कधी तडजोड केली नाही़ त्यांची नाटकं अनेकांसाठी मार्गदर्शक आहेत़
-प्रा़. दीपक देशपांडे,
हास्यसम्राट
डॉ. लागू म्हणजे नाट्यसृष्टीतला मोठा दीपस्तंभ होय़ त्यांची अनेक नाटके मी पाहिली आहेत़ ‘सूर्य पाहिलेला माणूस’, ‘मित्र’, ‘नटसम्राट’, ‘बेबंदशाही’, ‘लग्नाची बेडी’ यासह इतर अनेक नाटकं मराठी नाट्यसृष्टीत अजरामर ठरली आहेत़ त्यांच्या निधनाने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीची हानी झाली आहे़ ते कलावंतप्रेमी होते़ अनेक कलाप्रेमींना त्यांनी मोठे केले़ सर्वांचे ते आधारवड होते़
-प्रशांत बडवे
कार्याध्यक्ष : मराठी साहित्य परिषद, शाखा दक्षिण सोलापूर
कलावंतांवर अतिशय मनसोक्त प्रेम करणारा कलावंत आज आपल्यात नाही, ही गोष्ट मनाला पटत नाही़ ते माणूस म्हणून ग्रेट होते़ असा अत्यंत संयमी आणि संवेदनशील माणूस सिनेसृष्टीत शोधून सापडणार नाही़ ते अनेकांचे प्रेरणास्थान होते़ सोलापुरात अनेकदा त्यांची भेट झाली़ त्यांची नाटके पाहूनच आम्ही नाट्यप्रेमात पडलो़ त्यांना आणि त्यांच्या कामांना कधीच विसरता येणार नाही़ ते सदैव स्मरणात राहतील.
-प्रा़ अजय दासरी
अध्यक्ष : मराठी नाट्य परिषद, महानगर शाखा, सोलापूर
डॉ़ श्रीराम लागू यांच्या निधनाची बातमी ऐकून मी नि:शब्द झालो़ ते नाटककार म्हणून खूपच ग्रेट होते़ त्यांनी प्रायोगिक नाटकांना एक वेगळे व्यासपीठ मिळवून दिले़ अनेक वेगळी नाटके रंगमंचावर आणून त्यांनी रंगभूमीला एका उंचीवर आणले़ त्यावेळी अमोल पालेकर आणि डॉ़ लागू यांनी प्रायोगिक रंगभूमीला नवीन ऊर्जा मिळवून दिली़ डॉ़ लागू अत्यंत वेगळे होते़ एक नाटककार म्हणून आणि माणूस म्हणूनही़ आज त्यांच्या जाण्याने नाट्य क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे.
-आनंद खरबसकार्यकारिणी सदस्य : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मुंबई