सामाजिक विषयात घुमतोय तरुणाईचा आवाज !
By appasaheb.patil | Published: September 17, 2019 12:53 PM2019-09-17T12:53:16+5:302019-09-17T12:55:13+5:30
सोलापूर विद्यापीठ युवा महोत्सव; विद्यार्थ्यांची तयारी अंतिम टप्प्यात
सोलापूर : आर्थिक-सामाजिक विषमता, स्त्रियांवरील अत्याचार, पोलिसांची दडपशाही, सरकारची अकार्यक्षमता, नोकरशाहीची चालढकल वृत्ती, धार्मिकतेचे स्तोम, भ्रष्टाचार, बेरोजगारी, पर्यावरणाचा प्रश्न आदी अनेक विषयांवर पथनाट्ये, एकांकिका सादर करून विद्यार्थी यंदाच्या युवा महोत्सवात जागृतीचे काम करणार असल्याचे दिसून येत आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या युवा महोत्सवास गुरूवार, १९ सप्टेंबरपासून प्रारंभ होत आहे़ त्यादृष्टीने यजमान महाविद्यालय लोकमंगलने संपूर्ण तयारी केली आहे़ युवा महोत्सवात आपल्याच महाविद्यालयाचा प्रथम क्रमांक यावा यासाठी मागील दोन ते तीन महिन्यांपासून शहर व जिल्ह्यातील प्रत्येक महाविद्यालयात विद्यार्थी सराव करीत आहेत.
लोकनृत्य, एकांकिका, पथनाट्ये, समूहगीत, समूहनृत्य, शास्त्रीय नृत्य, मातीकाम, नकला, लघुनाटिका आदींची अंतिम तयारी आता महाविद्यालयस्तरावर दिसून येत आहे़ यजमान लोकमंगल महाविद्यालयाने २ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांची सोय केली आहे़ यासाठी विविध रंगमंच उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले असल्याची माहिती लोकमंगल महाविद्यालयाच्या सचिव अनिता ढोबळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
बुर्लाने दिला सांघिकवर भर
- राजेंद्र चौक परिसरात असलेल्या ए़ आऱ बुर्ला महिला महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी यंदाच्या युवा महोत्सवात सांघिक कलाप्रकारात टॉप राहण्यासाठी बाजी लावली आहे़ सांघिक कलाप्रकारात यंदा महाविद्यालयाने लोकनृत्य, पथनाट्य, लघुनाटिका, एकांकिका, शोभायात्रेत आपल्या महाविद्यालयाची वेगळी ओळख ठेवण्यासाठी कंबर कसली आहे़ प्राचार्य डॉ़ राजेंद्र शेंडगे, सहायक प्राध्यापिका रजनी दळवी, प्रा़ तुकाराम शिंदे, प्रा़ शंकर भांजे, अतिष पाटोळे, श्रीनिवास कुडक्याल यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनी परिश्रम घेत आहेत़
‘एलबीपीएम’ वेधणार लक्ष
- सात रस्ता परिसरातील रयत शिक्षण संस्था संचलित लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालयातील २८ विद्यार्थिनींनी यंदा युवा महोत्सवात सर्वाधिक कलाप्रकारांत यजमान राहण्यासाठी कंबर कसली आहे़ यंदा महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी लोकनृत्य, समूहगीत, लघुनाटिकेवर जास्तीचा भर दिला आहे़ याशिवाय विविध कलाप्रकारांची तयारी जोमाने करीत आहेत़ मागील वर्षी महाविद्यालयास तीन पारितोषिके मिळाली होती़ यंदा अधिक पारितोषिके मिळविण्यासाठी महाविद्यालय प्रयत्न करीत आहे़ यासाठी प्राचार्य डॉ़ दादासाहेब साळुंखे, उपप्राचार्य रावसाहेब ढवण, प्रा़ देवराव मुंढे यांच्यासह सांस्कृतिक विभागाचे प्रतिनिधी परिश्रम घेत आहेत़
दयानंद विधी महाविद्यालय राहणार १५ कलाप्रकारांत टॉप
- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठांतर्गत होणाºया युवा महोत्सवात यावर्षी डी़ जी़ बी़ दयानंद विधी महाविद्यालय मोठ्या जोमाने सहभागी होत आहे़ या महाविद्यालयातील एकूण १५ विद्यार्थी विविध कलाप्रकारांत सहभाग नोंदविणार आहेत़ यात वैयक्तिक व सांघिक कलाप्रकारांचा समावेश आहे़ सकारात्मक दृष्टिकोन कसा असावा यावर भाष्य करणारी एकांकिका विद्यार्थ्यांनी बसविली आहे़ यासाठी महाविद्यालयाचा विद्यार्थी सागर देवकुळे परिश्रम घेत आहे़ विधी महाविद्यालयाचे प्राचार्य यु़ मंगापती राव, सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा़ कटप यांच्यासह प्रा़ रवींद्र चलवादी हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व सहकार्य करीत आहेत़