साेलापूर, बार्शी, करमाळा बाजार समितीची मतदार यादी महिना अखेर पूर्ण करणार
By राकेश कदम | Published: May 18, 2023 06:49 PM2023-05-18T18:49:57+5:302023-05-18T18:50:15+5:30
जिल्हा उपनिबंधकांची माहिती, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या आदेशानुसार करणार कार्यवाही
साेलापूर : साेलापूर, बार्शी, करमाळा बाजार समितीच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी सादर करण्याचे आदेश सहायक निबंधकांना दिले आहेत. ही यादी महिनाअखेर पूर्ण हाेईल, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांनी गुरुवारी ‘लाेकमत’ला दिली.
गायकवाड म्हणाले, साेलापूर, बार्शी, करमाळा बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत १५ जुलै राेजी संपणार आहे. तत्पूर्वी प्रारूप मतदार यादी तयार करणे, अंतिम मतदार यादी तयार करणे आणि एकूणच निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे. या तीनही बाजार समित्यांच्या कार्यक्षेत्रातील विविध कार्यकारी साेसायट्यांचे संचालक आणि ग्रामपंचायत सदस्य याची माहिती सहायक निबंधकांकडून मागविण्यात आली आहे. ही सर्व प्रक्रिया ४५ दिवसांत पूर्ण हाेईल.
काय आहेत सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे आदेश
३१ डिसेंबर २०२३ पर्यंत निवडणूक पात्र असलेल्या कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात यावी. या कार्यवाहीचा अहवाल प्राधिकरणाला पाठविण्यात यावा असे आदेश राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने १० मे २०२३ राेजी जिल्हा उपनिबंधकांना दिले आहेत. मात्र यानुसार कार्यवाही हाेत नसल्याचा आक्षेप दक्षिण साेलापूर तालुक्यातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांनी घेतला हाेता. जिल्हा निबंधकांनी मतदार यादी तयार करण्याची कार्यवाही सुरू झाल्याचे म्हटले आहे.