कोरोनाची धाकधूक, उन्हाचा तडाखा तरीही मतदारांचा उत्साह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:21 AM2021-04-18T04:21:47+5:302021-04-18T04:21:47+5:30
पोटनिवडणुकीसाठी शनिवारी सकाळी मतदान सुरू झाले. कोरोनामुळे यावेळी पहिल्यांदा किमान १ तासभर मतदान लवकर सुरू करण्यात आले होते. मात्र, ...
पोटनिवडणुकीसाठी शनिवारी सकाळी मतदान सुरू झाले. कोरोनामुळे यावेळी पहिल्यांदा किमान १ तासभर मतदान लवकर सुरू करण्यात आले होते. मात्र, तरीही सकाळच्या सत्रात ग्रामीणसह शहरी भागात मतदारांमध्ये निरुत्साह दिसून आला. त्यामुळे पोटनिवडणुकीसाठी मतदान जेमतेम ५० ते ५५ टक्क्यांपर्यंत होईल असा अंदाज होता. मात्र, त्यानंतर शहरासह ग्रामीण भागातही प्रमुख पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मतदारांना बाहेर पडण्यासाठी उत्साहित केले. हे कार्यकर्ते मतदारांना रिक्षा, दुचाकी, चारचाकी, टमटममध्ये आणून मतदान केंद्रावर आणून सोडत होते. त्याठिकाणी मास्क लावण्याचे आवाहन करून तापमान चेक करून, सॅनिटायझरने हात स्वच्छ केल्यानंतरच मतदान केंद्रात सोडण्यात आले. अनेक नागरिक मतदानासाठी बाहेर पडत असल्याचे पाहून दुपारी १२ नंतर ग्रामीण भागात सकाळच्या सत्रातील आपली शेतीची कामे, जनावरांची देखभाल करून शेतकरी मतदानासाठी जात होते. एकपार्गे मजुरीसाठी जाणारे मजूरही दुपारनंतरच मतदानासाठी बाहेर पडल्याने मतदानाचा टक्का कमालीचा वाढला.
मतदान वाढू लागल्यानंतर मतदान केंद्रावर भेटीदरम्यान येणाऱ्या उमेदवार, नेत्याच्या चेहऱ्यावरही उत्साह जाणवला. दुपारी चारनंतर या मतदानाचा वेग आणखी वाढला. पंढरपूर शहरासह अनेक मोठ्या गावांतील मतदान केंद्रांवर रात्री ७ नंतरही उशिरापर्यंत मतदान सुरू होते. अनेक ठिकाणी रांगा पाहावयास मिळाल्या.
---
उशिरा अन् जादा झालेले मतदान कोणाच्या पथ्यावर
यावर्षी प्रथमच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदान सकाळी ७ ते रात्री ७ पर्यंत ठेवण्यात आले होते. पोटनिवडणूक, उन्हाळा, कोरोनामुळे मतदानाचा टक्का घसरेल असा अंदाज होता. मात्र, अशा काळातही मतदारांनी नेहमीच्या उत्साहात मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यामुळे मतदान ही जवळपास 70 टक्क्यांवर झाले आहे. रात्री उशिरापर्यंत झालेले मतदान, वाढलेला टक्का, हे मतदान कुणाच्या पथ्यावर पडणार, याबाबत उमेदवारासह नागरिकांमध्ये चर्चा आहे. मात्र, आता प्रमुख उमेदवारांची धाकधूक वाढणार आहे.
----
तरुणांचा पहिल्या मतदानाचा उत्साह, तर वृद्धांचं कर्तव्य
ही पोटनिवडणूक पंढरपूर-मंगळवेढ्याची असली तरी यावेळी जवळपास ५ हजारांपेक्षा जास्त नवमतदारांचा समावेश मतदार याद्यांमध्ये करण्यात आला आहे. यापैकी अनेक तरुण-तरुणींनी पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर मतदानानंतर वेगळा आनंद जाणवला, तर कोरोना, ऊन याची पर्वा न करता अनेक वृद्ध जोडप्यांनीही कर्तव्य समजून मतदानाचा हक्क बजावला. यावेळी अनेक वृद्धांना चालता येत नसताना व्हीलचेअर, गाडीवर, उचलून मतदान केंद्रात आणून मतदान करण्यात आले.