दुष्काळमुक्तीसाठी वडाळा ग्रामस्थांनी श्रमदानातून उभारले पाच वनराई बंधारे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 01:02 PM2018-10-13T13:02:48+5:302018-10-13T13:06:15+5:30
दुष्काळमुक्तीसाठी वडाळा ग्रामपंचायतीचे एक पाऊल पुढे
दत्तात्रय शिंदे
वडाळा: एकीचे बळ आणि श्रमदानानं काय होऊ शकतं याचा आदर्श वडाळा ग्रामपंचायतीने समोर ठेवलाय. दुष्काळमुक्तीसाठी इथल्या ग्रामस्थांनी एक पाऊल टाकत चक्क पाच वनराई बंधारे उभारले आहेत.
वडाळा ग्रामपंचायतीने पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून जलयुक्त शिवार, शोषखड्डेयुक्त व गटारमुक्त गाव यांसह अनेक पुरस्कार पटकावत तालुक्यात आदर्श निर्माण केला आहे. पाणीटंचाईच्या दृष्टीने सातत्याने प्रयत्न करत असलेल्या वडाळा ग्रामपंचायतीने व ग्रामस्थांनी पाच वनराई बंधाºयांची उभारणी केलीय. माळरानावरून वाहणाºया या ओढ्यावर सिमेंटच्या रिकाम्या पिशवीत माती भरून वनराई पद्धतीचे पाच बंधारे बांधले. २० ते ३० फूट उंचीचे व ५० ते १०० फूट रुंदीचे हे बंधारे बांधण्यात आले आहेत.
पावसाळा संपत आला तरी परतीचा पाऊस पडेल, या प्रतीक्षेत इथला शेतकरी आहे. या परिसरात कमी प्रमाणात पाऊस पडला असला तरी ते मिळणारे पाणी अडवले पाहिजे. ते पाणी वाहून जाण्यापेक्षा बंधारा बांधून साठवण्याचा निर्धार वडाळ्याचा ग्रामस्थांनी केला आणि तो पूर्णत्वासही आणला आहे.
पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून वडाळा गावामध्ये जलसंवर्धनाची चळवळ चांगल्या प्रकारे रुजू झाली आहे. ग्रामस्थ व बळीरामकाका साठे यांच्या सहभागातून हा उपक्रम चालू आहे. याचा गावाला नक्कीच फायदा होणार असून, चालू दुष्काळजन्य परिस्थितीतही वडाळा गावातील सध्या पाण्याची पातळी बºयापैकी आहे.
वनराई पद्धतीच्या बंधाºयामुळे पाण्याचे संवर्धन होणार असून, या भागातील शेतकºयांना त्याचा नक्की लाभ होणार आहे. गाव एका वेगळ्या विकासाच्या दृष्टीने वाटचाल करीत आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा एक आदर्श गाव म्हणून राष्ट्रीय पातळीवर नावलौकिकास येत आहे. या उपक्रमात गावचे सरपंच रूपाली गाडे, उपसरपंच जितेंद्र साठे, ग्रामविकास अधिकारी अनिल शिंदे, ग्रा.पं. सदस्य मनोज साठे यांच्यासह ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत वडाळा गाव पाणीयुक्त करण्यासाठी वाटचाल सुरू केली आहे.
ग्रामस्थांची साथ अन् ग्रामपंचायतीचे प्रयत्न
- उत्तर सोलापूर हा कायमच दुष्काळी तालुका आहे. त्यामुळे तालुक्यातील अनेक गावांना पिण्याच्या पाणीटंचाईला तोंड द्यावे लागते. त्यादृष्टीने वडाळा ग्रा.पं.च्या वतीने जलसंवर्धनाचे काम करण्याचा प्रयत्न करत आहोत. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ म्हणून गावची पाण्याची पातळी वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या उपक्रमाला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त साथ दिल्यामुळे ग्रामपंचायतीच्या पदाधिकाºयांना हुरूप आला आहे. जलसंवर्धनामध्ये गावाने ठसा उमटवण्याचा प्रयत्न चालवला असल्याचे जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि राष्टÑवादीचे कार्याध्यक्ष बळीराम साठे यांनी सांगितले.