Rain: कुर्डूवाडी बस डेपोत कमरेपर्यंत पाणी; अडकलेल्या दहा प्रवाशांना सुखरूप काढले बाहेर
By बाळकृष्ण दोड्डी | Published: October 7, 2022 03:13 PM2022-10-07T15:13:18+5:302022-10-07T15:14:25+5:30
Rain: कुर्डूवाडी बस डेपोत कमरेपर्यंत पावसाचे पाणी साचल्यामुळे डेपोत अडकलेल्या दहा प्रवाशांचा जीव टांगणीला लागला होता. एसटी विभागाचे वरिष्ठ अधिकारी डेपोत तात्काळ दाखल होऊन अडकलेल्या प्रवाशी तसेच तेथील कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर काढले.
- बाळकृष्ण दोड्डी
सोलापूर : कुर्डूवाडी बस डेपोत कमरेपर्यंत पावसाचे पाणी साचल्यामुळे डेपोत अडकलेल्या दहा प्रवाशांचा जीव टांगणीला लागला होता. एसटी विभागाचे वरिष्ठ अधिकारी डेपोत तात्काळ दाखल होऊन अडकलेल्या प्रवाशी तसेच तेथील कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी पावसाच्या पाण्याला वाट करून दिली. साचलेल्या पाण्याची पातळी आता कमी होवू लागली असून डेपो पूर्वपदावर येत असल्याची माहिती सोलापूर आगाराचे विभाग नियंत्रक विलास राठोड यांनी दिली आहे.
गुरुवारी रात्री सोलापूर शहर व ग्रामीण परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. कुर्डूवाडी जवळील केम परिसरात ढगफुटी झाल्याची माहिती आहे. या परिसरात चांगला पाऊस झाल्यामुळे करमाळ्याहून कुर्डूवाडीकडे येणारा नाला ओव्हरफ्लो झाला. या नाल्याचे पाणी डेपोमध्ये शिरल्यामुळे कुर्डूवाडी डेपो परिसरात कमरेपर्यंत पाणी साचले. या डेपोत काही प्रवासी रात्री थांबून होते. सकाळी संपूर्ण डेपो परिसरात कमरेपर्यंत पाणी साचल्यामुळे प्रवाशांना सुखरूप बाहेर पडता आले नाही. तसेच या ठिकाणी एसटी विभागाचे दहा ते बारा कर्मचारी अडकून पडले. सकाळी सात दरम्यान विभाग नियंत्रक विलास राठोड हे त्यांच्या पथकासह कुर्डूवाडी डेपोत दाखल झाले. पाण्याला वाट करून देण्यासाठी त्यांनी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या परिश्रमानंतर अवघ्या काही तासात पाण्याची पातळी कमी झाली. त्यानंतर तेथून प्रवासी तसेच कर्मचाऱ्यांना डेपोतून बाहेर काढले.