‘वेट ॲन्ड वॉच’ कल्याणराव काळेंची भूमिका गुलदस्त्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:21 AM2021-03-28T04:21:04+5:302021-03-28T04:21:04+5:30
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक १७ एप्रिल रोजी होत आहे. २३ मार्चपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. ३० मार्च ...
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक १७ एप्रिल रोजी होत आहे. २३ मार्चपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. ३० मार्च अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. दिवंगत आ. भारत भालके यांच्या कुटुंबातील व्यक्तीला महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळणार हे जवळपास निश्चित असले तरी त्याबाबत अधिकृत घोषणा राष्ट्रवादीकडून केली गेली नाही.
भाजपकडूनही समाधान आवताडे की परिचारक याबाबतचा सस्पेन्स कायम आहे. महाविकास आघाडीत बंडखोरी करीत शैला गोडसे यांनी जनता हाच आपला पक्ष मानून निवडणुकीत उडी घेतली आहे. त्यामुळे वातावरण ढवळून निघत असले तरी पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाच्या निर्मितीपासून निर्णायक भूमिका बजावणारे सहकार शिरोमणीचे अध्यक्ष कल्याणराव काळे हे मात्र अजूनही ‘वेट ॲन्ड वाॅच’ या भूमिकेत आहेत. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
कल्याणराव काळे यांना पंढरपूर तालुक्यातील शहर व २२ गावांमध्ये मानणारा मोठा वर्ग आहे. याच मतदारसंघात खर्डी येथे सीताराम साखर कारखाना आहे. त्या कारखान्याच्या माध्यमातून मंगळवेढ्यातील काही गावांमध्येही त्यांचा संपर्क आहे. गेल्या काही निवडणुकांमध्ये विठ्ठल परिवाराच्या माध्यमातून भारत भालके यांच्या मागे भक्कमपणे उभे राहण्याची भूमिका त्यांनी घेतली होती. त्यामुळेच त्यांनी आमदारकीची हॅट्ट्रिक केली होती. त्यांच्या निधनानंतरही विठ्ठल परिवाराच्या पालकत्वाची भूमिका घेत कल्याणराव काळे यांनी परिवार एकसंध ठेवावा, असा कानमंत्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला होता. त्यानंतर कल्याणराव काळे यांनी विठ्ठलच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सर्वांना एकत्र ठेवत भगीरथ भालके यांची अध्यक्षपदी नेमणूक करताना विठ्ठल कारखान्यावर उपस्थिती लावली.
मात्र, त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये घडलेल्या पदाधिकारी निवडीचा घोळ अथवा पोटनिवडणुकीसंदर्भात महाविकास आघाडी, भाजपकडून उमेदवारीची चाचपणी करताना ते कुठेही दिसले नाहीत. त्यामुळे त्यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली होती.
काळे महाविकास आघाडी की भाजपचा रस्ता सुकर करणार
काळे सध्या अधिकृतपणे भाजपचे असले तरी विठ्ठल परिवाराच्या माध्यमातून ते दिवंगत आ. भालके यांच्यासोबत कायम होते. गेल्या ग्रा.पं. निवडणुकीतही त्यांनी आपल्या समर्थकांना परिचारक गटासोबत युती न करता विठ्ठल परिवाराच्या माध्यमातून निवडणूक लढविण्याचे उघड आदेश दिले होते. त्यामुळे ते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार, अशा जोरदार चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर विधानसभा पोटनिवडणुकीसंदर्भात अजून आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. मात्र, काळे विठ्ठल परिवाराच्या माध्यमातून पुन्हा महाविकास आघाडीला साथ देणार, की पक्षाचा आदेश मानत भाजपचा रस्ता सुकर करणार, याबाबत कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे.
----
याबाबत आपण सध्यातरी थांबा आणि पाहा या भूमिकेत आहोत. पोटनिवडणूक लागली असली तरी पक्षाचे अधिकृत उमेदवार जाहीर झाले नाहीत. उमेदवार जाहीर झाल्यानंतर आपण मतदारसंघातील सर्व समर्थकांची स्वतंत्र बैठक घेणार आहोत. कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर आपली भूमिका स्पष्ट करू.
- कल्याणराव काळे, अध्यक्ष, सहकार शिरोमणी कारखाना.