आठ दिवस थांबा, रिझल्ट दिसतील
By admin | Published: June 14, 2014 01:18 AM2014-06-14T01:18:30+5:302014-06-14T01:18:30+5:30
चंद्रकांत गुडेवार: जि. प. पदाधिकाऱ्यांना दिला शब्द
सोलापूर: आठ दिवस थांबा तुम्हाला रिझल्ट दाखवितो, अशी हमी दिली आहे जिल्हा परिषदेचे तात्पुरता सीईओ चंद्रकांत गुडेवार यांनी. नियम सोडून काहीच सांगणार नाही, परंतु फाईलचा निपटारा दररोजच्या दररोज व्हावा, तरच ग्रामीण भागातील लोकांची कामे होतील अशी पदाधिकाऱ्यांनी विनंतीवजा सूचना केली.
गुरुवारी सायंकाळी पाच वाजता जि.प. सीईओचा पदभार घेतल्यानंतर सायंकाळी दीड तास खातेप्रमुखांचे प्रबोधनाद्वारे कामाची पद्धत सांगितली होती.
शुक्रवारी सकाळी १० वाजता अक्कलकोट पंचायत समितीला धडक मारली. त्यानंतर महानगरपालिकेत एक बैठक संपवून १२ वाजता त्यांनी जिल्हा परिषद गाठली.
थोडा वेळ त्यांनी पत्रकारांशी संवाद साधल्यानंतर ते पदाधिकाऱ्यांच्या भेटीसाठी त्यांच्या दालनाकडे स्वत:हून गेले. उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांच्या दालनात गुळवे व समाजकल्याणचे सभापती शिवाजी कांबळे यांनी त्यांचे स्वागत केले. कामाची पद्धत व जि.प.ची माहिती त्यांनी घेतली.
त्यानंतर अध्यक्षांच्या दालनात डॉ. निशिगंधा माळी, सभापती शिवानंद पाटील, जयमाला गायकवाड यांनी त्यांचे स्वागत केले. पदाधिकाऱ्यांशी चर्चा करताना गुडेवार यांनी आठ दिवस थांबा रिझल्ट दाखवितो, अशी हमी दिली.
-------------------------
कोण काय म्हणाले...
दोन-तीन वर्षे फाईल निकाली निघत नाहीत, नियमात असणारी कामे वेळेत करा: शिवाजी कांबळे
अनधिकृत कामे सांगणार नाही, अधिकृत कामे नियमित व्हावीत, ही अपेक्षा: सुभाष गुळवे
जे अधिकारी अगोदर दोन कामे अनधिकृत करतो, त्यालाच तिसरे अनधिकृत काम सांगतात: चंद्रकांत गुडेवार
ज्या दिवशी फाईल येईल त्याच दिवशी निकाली निघेल: चंद्रकांत गुडेवार
घेतलेल्या निर्णयाची व केलेल्या घोषणांची त्वरेने अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.: डॉ.निशिगंधा माळी