प्रतिक्षा संपली़...!! इंद्रायणी एक्स्प्रेस सहा मार्चपासून सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 03:05 PM2018-02-27T15:05:17+5:302018-02-27T15:05:17+5:30
१२५ दिवसांच्या विश्रांतीनंतर सोलापूरकरांच्या हक्काची इंद्रायणी एक्स्प्रेस (पुणे-सोलापूर इंटरसिटी) ६ मार्चपासून सुरू होत आहे़ तसेच वाशिंबे-जेऊरदरम्यान सुरू असलेले काम देखील रेल्वेने पूर्ण केले.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि २७ : १२५ दिवसांच्या विश्रांतीनंतर सोलापूरकरांच्या हक्काची इंद्रायणी एक्स्प्रेस (पुणे-सोलापूर इंटरसिटी) ६ मार्चपासून सुरू होत आहे़ तसेच वाशिंबे-जेऊरदरम्यान सुरू असलेले काम देखील रेल्वेने पूर्ण केले असून, यापुढे गाड्या नियमित धावतील़
ही गाडी पूर्वीच्या वेळी दुपारी दोनच्या सुमारास सोलापूर-पुणे स्थानकादरम्यान धावणार आहे़ तसेच पुण्याहून सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास सोलापूरकडे रवाना होईल़ या गाडीमुळे उन्हाळी सुट्टीत प्रवाशांना लाभ होणार आहे, अशी माहिती सहायक विभागीय व्यवस्थापक विमलकिशोर नागर यांनी दिली़
रेल्वे प्रशासनाने वाशिंबे-जेऊरदरम्यान ट्रॅकच्या कामामुळे १ नोव्हेंबर २०१७ पासून दररोज १ तास ४५ मिनिटांचा ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला होता़ त्यामुळे दुपारच्या सत्रात पुण्याकडे जाणाºया प्रवाशांना कसरत करत प्रवास करावा लागत होता़ अनेक जणांनी सकाळच्या सत्रात जाणाºया हुतात्मा एक्स्प्रेसने प्रवास करत पुण्याला जाणे पसंत केले आहे़
------------------------------
इतर दोन गाड्याही सुरू
- वाशिंबे-जेऊरदरम्यानच्या कामासाठी इंद्रायणीसह तीन गाड्या काही दिवसांसाठी बंद होत्या़ अनेकदा प्रवाशांना गैरसोयींना सामोरे जावे लागले होते़ ६ मार्चपासून गाडी सुरू होणार असल्याने आॅनलाईन तिकिटे दिली जात आहेत़ इंद्रायणीबरोबरच आठवड्यातून तीन दिवस धावणारी साईनगर-पंढरपूर (११००१/२) आणि हैदराबाद-पुणे (१७०१३/१४) दोन्ही सुरू होत आहेत.