चालण्याचा व्यायाम एकदम सोपा; तुमच्या हृदयाचा नक्की टळेल धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2021 04:08 PM2021-08-05T16:08:48+5:302021-08-05T16:08:54+5:30
डॉक्टरही सांगतात वॉकिंग मस्ट ! : झपझप चालण्यामुळे तणाव होतो दूर
सोलापूर : पायी चालण्याचे अनेक फायदे आहेत. अनेकजण चालण्याचे फायदे माहीत असूनही चालणे टाळतात. पण आजच्या लाइफस्टाइलमध्ये चालणे फारच गरजेचे झाले आहे. वेगात चालण्याने ताण दूर होतो, रुग्णालयात ॲडमिट होण्याची आणि तिथे जास्त काळ राहावं लागण्याची भीती कमी होते. डॉक्टर मंडळीही नेहमीच वॉकिंग करण्याचा सल्ला देत असतात.
सकाळी चालण्यामुळे सकाळच्या वातावरणातील शुद्ध ऑक्सिजनचा शरीराला पुरवठा होतो. हाडांच्या मजबुतीसाठी आवश्यक असलेले डी जीवनसत्त्व सकाळच्या कोवळ्या उन्हातून मिळते. चालण्यामुळे एकाच वेळी शारीरिक व मानसिक व्यायामही होतो. सतत काम करून तन-मनाला आलेला थकवाही चालण्यामुळे दूर होतो. चालण्यामुळे तणाव आणि चिडचिडपणा दूर होण्यास मदत मिळून झोपही चांगली लागते.
मन एकाग्रतेसाठी व चिंतनासाठीही चालणे फायदेशीर ठरते. चालण्यामुळे शरीरातील जास्तीचे उष्मांक जाळते, चरबीचे प्रमाण कमी होते, संधीवाताचा त्रास कमी होऊ शकतो, पचनक्रिया सुधारते, पचनाचे विकार कमी होतात. झपझप चालण्यामुळे हृदयाची गती वाढते, नियमित चालण्याने फुप्फुसाची कार्यक्षमता वाढते, पाठीचे दुखणे, हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, श्वासाच्या त्रासावर नियंत्रण मिळते.
रोज एक तास चालायला हवे पण ज्यांना एक तास देणे शक्य होत नाही त्यांनी अर्ध्या तासामध्ये किमान तीन किलोमीटर चालायला हवे. ह्रदयाची कार्यक्षमता चांगली राहण्यासाठी चालणे उत्तम आहे. एकाच स्थितीत जास्त वेळ काम करु नये, टेबल व खुर्चीची उंची योग्य असावी, झोपताना फार मऊ गादीवर झोपू नये.
- डॉ. अभिजित जगताप, अस्थिविकार तज्ज्ञ
बैठे कामाचे दुष्परिणाम
लॉकडाऊनमुळे अनेक लोक हे वर्क फ्रॉम होम करत होते. त्यात काही शिथिलता आली असली तरी अनेक लोक हे आत्ताही घरुनच काम करत आहेत. घरी असल्याने कामाचे तासही वाढले. तासनतास लोक लॅपटॉप, कॉम्प्युटरसमोर बसून राहत आहेत. यामुळे अनेक शारीरिक समस्यांचा सामना करावा लागतो आहे. मान आणि पाठदुखीची समस्या वाढत आहेत.
चाळीशी ओलांडली किमान अर्धा तास चाला
आजच्या बदलत्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर होताना दिसत आहे. रोजच्या व्यापामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष होते. आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी दररोज व्यायाम करणे फार गरजेचे असते. चाळीशीनंतर दररोज किमान ३० मिनिटे चालायला हवे. सतत गाडी वापरण्यामुळे पायी चालणे अनेकजण जवळपास विसरूनच जातात. त्यामुळे काही पाऊले चाललो, तरी अनेकदा धाप लागते, असे होत असल्यास, हा शरीराने आपल्याला दिलेला इशारा असतो.
-----------
तरुणपणीच होतोय पाठदुखीचा त्रास
मागील दीड वर्षापासून घरुनच काम करत आहे. काम करत असताना सलग तीन ते चार तास बसून रहावे लागते. मधून थोडासा वेळ मिळत असला तरी तो अपुरा पडतो. त्यामुळे यामुळे पाठदुखीचा त्रास होत आहे.
- योगेश भाईकट्टी, सॉफ्टवेअर इंजिनिअर
घरुन काम करत असलो तरी ऑफिसमध्ये जितके काम करायचो त्यापेक्षा आता जास्त काम करावे लागत आहे. बाहेर फिरायला वेळ मिळत नाही. काम करताना काही त्रास जाणवत नसला तरी नंतर पाठ दुखते.
- चैतन्य गायकवाड, सॉफ्टवेअर इंजिनिअर
----------------
योगही आवश्यक
- - पाठदुखीचा त्रास कमी करण्यासाठी योगासनाचा चांगला फायदा होतो.
- - त्रिकोणासन, पवनमुक्तासन, कटिचक्रासन, अर्ध मत्सेंद्रासन, मार्जारी आसन, भुजंगासन आदी आसने फायदेशीर असतात.
- - तज्ज्ञांच्या सल्ल्याने ही आसने करावीत.