भटक्या कुत्र्यांची स्वखर्चातून भूक भागवितोय ‘अन्नदाता’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 10:55 AM2019-08-19T10:55:20+5:302019-08-19T10:56:57+5:30
जवळ बोलावून घालतात खाऊ : अकरा वर्षांपासून दररोज दोन वेळा भागवितात भूक
रुपेश हेळवे
सोलापूर : कुत्र्याइतका प्रामाणिक प्राणी कोणता नाही़, असे सांगितले जाते़ याची अनेक जिवंत उदाहरणेही आपण अनेकांनी पाहिली आहेत़ पण हाच कुत्रा कधी रस्त्यावर फिरताना दिसला की मग त्याला गाडीवर जाता-जाता लाथा मारणारे, दगड मारणारे, हुसकावणारे आपण शेकडो पाहिले असतील़ पण भटका कुत्रा दिसल्यावर त्याला जवळ बोलावून त्याची सेवा करणारा ‘कुत्र्यांचा अन्नदाता’ सोलापुरात आहे़ न चुकता दिवसातून दोन वेळा कुत्र्यांना जेवायला देणारा हा माणूस़ शहरातील जवळपास शंभर भटक्या कुत्र्यांना स्वखर्चाने खायला घालतो़ एवढेच नाही तर त्यांच्यावर औषधोपचारही तो करतो.
मोकाटकुत्री म्हणजे खूप वाईट, कधीही चावतील, गाडीच्या मध्ये येऊन आपल्याला पाडतील, अशा भीतीने अनेक जण कुत्र्याला जवळ बोलावत नाहीत. पण एकदा जर तुम्हाला कुत्र्यांचा लळा लागला की मग तुम्ही त्यांना खाऊ घाला किंवा न घाला ते तुमच्या जवळ येणारच असाच लळा २००८ मध्ये सोलापुरातील जी़ शिंदे यांना लागला. यामुळेच ते दिवसातून दोन वेळा दररोज जवळपास शंभर कुत्र्यांना न चुकता खाऊ घालतात़ तेव्हापासून त्यांची ही सेवा निरंतरपणे चालू आहे़ एवढेच नाही तर कुत्र्यांना जर कुठे जखम झाली असेल तर त्यांना ते औषधोपचारही करतात़ यामुळे ते शहरात कुठेही फिरले तरी त्यांच्याजवळ कुत्र्यांचा घोळका उभारलेला असतो.
ते सकाळी पार्क चौक, पार्क चौक परिसरातील विविध चाळ, आरटीओ परिसरात कुत्र्यांना दररोज अन्न घालतात़ याचबरोबर ते जिथे राहतात त्यांच्या घराच्या परिसरात असणाºया कुत्र्यांनाही ते दररोज खाऊ घालतात़ एवढंच नाही तर पाऊस सुरू झाला की मग लगेच त्या कुत्र्यांना आपल्या अंगणात जागाही देतात़ यामुळे त्यांना अनेकदा अडचणी येतात़ कुत्री येणाºया-जाण्यांवर भुंकतात, तेव्हा मात्र शेजाºयांशी त्यांचे वाद होत असतात़ पण तरीही ते आपली सेवा निरंतर सुरूच ठेवतात़ शिंदे यांना तीन मुले आहेत़ ही तिन्ही मुले उच्चशिक्षण घेत आहेत़ मुले आणि त्यांची पत्नी या सेवेत शिंदे यांना मदत करतात.
कुत्र्यांसाठी दररोज शंभर ब्रेड पाकिटे ...
एका मोकाट कुत्रीने आॅफिसच्या खाली पिल्लांना जन्म दिला होता, हे शिंदे यांना दिसले़ खूप दिवस होऊनही तिला काही खायला मिळाले नाही़ त्यामुळे कुत्री व पिल्ले हे अशक्त होऊन पडले होते़ अशी अवस्था दिसल्यावर त्यांना वाईट वाटले आणि त्यांना थोडे दिवस खायला दिले़ कुठेही पिल्लांसह कुत्री दिसली की त्यांना खाऊ घालू लागले़ हळूहळू याची सवयच त्यांना पडली़आता ते कुत्र्यांसाठी दररोज शंभर ब्रेड पाकिटे आणि नऊ लिटर दूध घेतात़ आणि दररोज दोन वेळेस या कुत्र्यांना खाऊ घालत असतात.