वांगीकरांनी दिली सुरक्षारक्षकाच्या हाती सत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 06:43 AM2021-02-05T06:43:11+5:302021-02-05T06:43:11+5:30
तसं तालुक्यातील इतर गावांप्रमाणेच वांगीही राजकीय वादात भाजून निघालेले गाव. गाव दुष्काळाने होरपळत होते अन् विहिरींना टिपूसभरही पाणी नव्हते. ...
तसं तालुक्यातील इतर गावांप्रमाणेच वांगीही राजकीय वादात भाजून निघालेले गाव. गाव दुष्काळाने होरपळत होते अन् विहिरींना टिपूसभरही पाणी नव्हते. संपूृर्ण शिवार उजाड पडले होते. परिस्थिती बदलण्यासाठी गावकऱ्यांनी ‘सत्यमेव जयते वाॅटर कप’ स्पर्धेत सहभाग घेतला अन् बघता-बघता उत्तर तालुक्यात वांगीचे काम सरस ठरले. त्यामुळे २०१८ मध्ये वांगीचा तालुक्यात प्रथम क्रमांकाने गौरव झाला. मात्र, मिळालेल्या पैशातून गावाच्या विकासाला दिशा काही मिळत नव्हती.
३०-३५ वर्षे गावावर एकहाती सत्ता असलेल्या पाटील कुटुंबानेच राजकीय विरोधकाच्या हाती २०१५ मध्ये गावचा कारभार सोपविला होता. मात्र, विकास कामात पाटील व सरपंचांचे एकमत होत नव्हते. विकास कामांचा रुतलेला गाडा पुढे घेऊन जाण्यासाठी पाटील गटाची ३५ वर्षांची सत्ता गावकऱ्यांनी घालविली.
मराठा बटालियनमध्ये २१ वर्षे हवालदार म्हणून काम केल्यानंतर सेवानिवृत्त झालेल्या आबासाहेब अवताडे यांच्याकडे एकहाती सत्ता गावकऱ्यांनी दिली आहे. मेजर म्हणून ओळख असलेले अवताडे चिंचोलीकाटी औद्योगिक वसाहतीत सुरक्षा रक्षकाची सेवा बजावत होते.
मोफत पिठाची गिरणी..
पहिले काम हे कर भरणाऱ्या गावकऱ्यांसाठी मोफत पिठाची गिरणी सुरू केली जाईल, असे आबासाहेब अवताडे यांनी सांगितले. रस्ते, गटारी व जाहीरनाम्यातील कामे तर करायचीच आहेत, असे आवताडे म्हणाले. पाणी फाउंडेशनच्या रकमेतून कोणती कामे करायची ते बैठक घेऊन ठरविण्यात येईल, असे अवताडे यांनी सांगितले.
----