प्रभाग रचना, मतदार याद्यांवर हरकती न घेताच होणार निवडणुका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:37 AM2020-12-16T04:37:10+5:302020-12-16T04:37:10+5:30
प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेले प्रभाग, मतदार याद्या यावर तालुक्यातून शेकडो हरकती आल्यानंतरही त्यापैकी एकाही हरकतीवर सुनावणी न घेता प्रशासनाकडून ...
प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेले प्रभाग, मतदार याद्या यावर तालुक्यातून शेकडो हरकती आल्यानंतरही त्यापैकी एकाही हरकतीवर सुनावणी न घेता प्रशासनाकडून जाहीर केलेले प्रभाग, मतदार याद्या जशाच्या तशा कायम ठेवल्या आहेत. जात आहे. पंढरपूर तालुक्यात ७२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा प्रोग्रॅम जाहीर झाला आहे. प्रत्येक पंचवार्षिकला महसूल प्रशासनाकडून तालुक्यातील तहसीलदारांमार्फत मतदारांच्या कच्च्या याद्या, प्रभाग रचना जाहीर केली जाते. त्यावर गावातील तक्रारी दाखल करून घेतल्या जातात. त्याची सुनावणी घेऊन निर्णय दिल्यानंतर पक्क्या याद्या प्रसिद्ध करून उमेदवारांचे अर्ज भरून घेतले जातात. त्यानुसार उमेदवारी अर्ज स्वीकारणे, अर्जांची छाननी, अर्ज माघारी घेणे व गरज पडल्यास त्या ठिकाणी निवडणूक घेण्याची प्रक्रिया आहे. मात्र यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निवडणुका पुढे ढकलाव्या लागल्या. तेव्हापासून निवडणूक प्रक्रियेत गोंधळ सुरू असल्याचे चित्र आहे.
काही दिवसांपूर्वी सरपंचपदाचे आरक्षण सोडतीची तारीख प्रशासनाकडून जाहीर केली. मात्र अवघ्या काही दिवसांत त्यात बदल करत ती आता ग्रामपंचायत निवडणुकीनंतर काढली जाणार असल्याची अधिसूचना प्रशासनाकडून काढण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये गोंधळाचे वातावरण असताना आता गावागावातील हरकतीही प्रशासन ऐकून न घेता निवडणूक घेणार असल्याने निवडणूक कार्यक्रम कशाला जाहीर केला, असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत.
कोट :
याविषयी आम्ही प्रशासनाकडे हरकत नोंदविली होती. मात्र प्रशासनाकडून सप्टेंबरमध्ये जाहीर केलेल्या जीआरनुसार निवडणुका होत असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र जीआर सप्टेंबरमध्ये आणि निवडणुका जानेवारीमध्ये हे धोरण चुकीचे आहे. प्रत्येक निवडणुकीप्रमाणे नागरिक, मतदारांच्या हरकती नोंदवून घेणे, त्यावर निर्णय देणे गरजेचे असताना तसे होताना दिसत नाही. त्यामुळे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागणार आहे.
- सुग्रीव कोळी, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी पदवीधर संघटना
कोट
यावर्षी सुनावण्या न घेताच पक्क्या मतदार याद्या प्रसिद्ध करण्याच्या सूचना आहेत. त्यामुळे कुणाच्याही हरकतीवर सुनावणी घेण्यात आली नाही. तरीही तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून याविषयी अधिक माहिती घ्यावी. आमच्याकडे असलेल्या सूचनांप्रमाणे आम्ही निवडणूक प्रक्रिया राबवत आहोत.
- हौसेकर, मंडल अधिकारी, पटवर्धन कुरोली