जिल्ह्यातील कारखान्यांची गोदामे तुडुंब भरलेली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:22 AM2021-04-04T04:22:32+5:302021-04-04T04:22:32+5:30
राज्यातील सर्वाधिक साखर कारखान्यांच्या सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांचे प्रश्न आता अधिकच बिकट बनत चालले आहेत. त्यात विक्रीविना गोदामात साठलेली ...
राज्यातील सर्वाधिक साखर कारखान्यांच्या सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांचे प्रश्न आता अधिकच बिकट बनत चालले आहेत. त्यात विक्रीविना गोदामात साठलेली साखर हा सर्वात गंभीर प्रश्न कारखानदारांना सतावत आहे. एकीकडे ऊस उत्पादक शेतकरी उसाच्या बिलासाठी कारखान्याकडे चकरा मारत आहेत, तर कारखानदार ही रक्कम देण्यासाठी बँकांचे दरवाजे ठोठावत आहेत; परंतु हा प्रश्न काही सुटता सुटेना.
कारखानदारीचे आर्थिक जुगाड जुळत नसल्याने साखर विक्रीची समस्या आता सर्वांचीच डोकेदुखी ठरत आहे.
केंद्र सरकारने साखर विक्रीसाठी किमान विक्री मूल्य (एमएसपी) प्रतिक्विंटल ३१०० रुपये निश्चित केले आहे. त्यापेक्षा कमी दराने साखर विक्री केल्यास कारखान्यांना दंड आकारला जातो. मात्र, सध्या जागतिक बाजारात साखरेचे दर घसरले आहेत. साखर व्यापारी एमएसपीपेक्षा क्विंटलमागे २०० रुपये कमी दराने साखरेची मागणी करीत असल्याने विक्री कमालीची घटली आहे.
दुसरीकडे ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचा तगादा वाढल्याने मिळेल त्या दराने साखर विक्री करण्याची नामुष्की अनेक कारखान्यांवर आली आहे.
---------
असा ठरतो साखर विक्रीचा कोटा
हंगामात उत्पादित केलेल्या साखरेच्या प्रमाणात विक्रीसाठी कोटा निश्चित करून दिला जातो. एक लाख क्विंटल साखर उत्पादन झाल्यास दरमहा १२ हजार क्विंटल साखरेची विक्री करता येते. त्यात कमी-जास्त विक्री करता येत नाही. साहजिकच कारखानदार मिळेल त्या दराने साखर विकून शेतकऱ्यांना रकमा देण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र, त्यामुळे आर्थिक तोट्याचा सामना करावा लागत आहे.
------
जिल्ह्यात ८० लाख साखर पोती साठा
सोलापूर जिल्ह्यात गतवर्षीच्या गळीत हंगामातील ३२ लाख क्विंटल साखर विक्रीविना गोदामात पडून राहिले आहे यंदाच्या हंगामाने त्यात भर टाकली आहे जागतिक मंदीमुळे अनेक कारखान्यांची साखर विकली गेली नाही. एमएसपी वाढवून मिळेल या आशेने कारखान्यांनी साखर न विकता तशीच ठेवली. ऊस बिलांसाठी कर्जाऊ रकमा घेतल्या आता साखर तशीच पडून राहिल्याने कर्जाचा डोंगर वाढला. हंगामा अखेर जिल्ह्यात ८० लाख पोती साखरेचा साठा आहे.
----------
जिल्ह्यातील साखर साठ्याची स्थिती
गतहंगामातील साखर साठा ३२ लाख ४५ हजार क्विं. नव्याने उत्पादित केलेली साखर ७७ लाख ३३ हजार क्विं. फेब्रुवारी २०२१ अखेर विक्री २६ लाख ५० हजार क्विं. शिल्लक साखर (फेब्रु.अखेर) ७९ लाख १५ हजार क्विं.
------
साखर विक्रीचा कोटा वाढत नाही तर कारखाने रकमा कोठून उपलब्ध करतील हा विचार होत नाही. कारखानदार सध्या दुहेरी संकटात सापडले आहेत. त्यांची आर्थिक स्थिती आणि मनस्थिती बिघडणार नाही तर काय होईल.
-व्ही. पी. पाटील, चेअरमन
गोकुळ माऊली शुगर्स, तडवळ
-------