पोलीस दलातही वारकरी संप्रदाय तयार झाला - एस. विरेश प्रभू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 01:04 PM2018-07-17T13:04:11+5:302018-07-17T13:06:55+5:30
वारी अधिकाºयांची....लोकमत पंढरपूर आषाढी वारी स्पेशल
न वर्षांपूर्वी मी सोलापूर जिल्ह्यात रुजू झालो तेव्हा वारी तोंडावर होती. एवढ्या मोठ्या गर्दीचे नियंत्रण करायचे कसे हा प्रश्न माझ्यासमोर होताच. आमच्या सहकाºयांनी तयार केलेला कागदावरचा आराखडा माझ्यासमोर होता. पण प्रत्यक्षात काय होईल याबद्दल धाकधूक होती. वारीमध्ये आमचे लोक १५-१५ तास काम कसे करतील, याबद्दलही शंका होती.
वारीमध्ये सहभागी झाल्यानंतर मात्र खूपच सुखद अनुभव आला. वारकरी खूपच शिस्तबद्ध पद्धतीने चालत होते, माऊली माऊली म्हणत गर्दीतून वाट काढीत होते. त्यांचा उत्साह आम्हाला ऊर्जा देणारा ठरला. यामुळेच तर पोलीस कर्मचारी उत्साहात काम करीत असल्याचे पाहायला मिळाले. इतर बंदोबस्तांपेक्षा हा बंदोबस्त खूपच वेगळा असल्याचेही मला लक्षात आले. एरव्ही व्हीआयपी सभा, गर्दी येथील अनुभव आणि वारीचा अनुभव वेगळा ठरला.
आता मी माझ्या सहकाºयांना नेहमी सांगतो की, वारीला येणारी माणसं खूप चांगली माणसं असतात. ही माणसं आहेत म्हणून समाजात अनेक चांगल्या गोष्टी आहेत. कायदा व सुव्यवस्था सांभाळणारी ही एकप्रकारची शक्ती आहेच. मी पाहतोय की वयाची पासष्टी ओलांडलेली हजारो माणसं चालत पंढरपूरला येतात आणि चालतच परत जातात. या अशा माणसांची सेवा हे आमचे आणि विशेषत: सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे भाग्यच आहे.
मी माझ्या सहकाºयांना सांगितलंय की, या बंदोबस्तात तुम्ही काठी वापरायचीच नाही. तुमची काठी तिकडे गुन्हेगारांसाठी वापरा. वारीच्या बंदोबस्ताला काठीची गरज नाही. फक्त शिड्डीवर काम होऊन जाते. ज्या आस्थेने लोक येतात, ती भावना तुम्ही समजून घ्या. शहरातील सर्वसामान्य माणसांपेक्षा मोठ्या उंचीवर पोहोचलेली ही मंडळी आहेत. आमच्या पोलीस दलातील काही लोक तर आवर्जून वारीचा बंदोबस्त मागवून घेतात. आम्ही देहू, आळंदीलाही सोलापूर पोलीस दलातील काही लोकांना पाठवितो. पुण्यातही पाठवितो. साहेब मला आळंदीला पाठवा, मी चालत येतो, असे म्हणणारेही कर्मचारी आहेत.
पंढरपुरातही बंदोबस्ताला जाणारे काही लोक आहेत. १० ते १५ लोक दरवर्षी आपल्या पोलीस निरीक्षकाला सांगतात की, साहेब मला वारीच्या बंदोबस्ताला पाठवा. सोलापूरच्या पोलीस दलातही आता एक वारकरी संप्रदाय तयार झाला आहे. वारीतून समाज प्रबोधनाचे मोठे काम होते. यंदाच्या वारीमध्ये पोलीस दलाची एक प्रबोधन दिंडी सहभागी झाली आहे.
शब्दांकन : राकेश कदम