पंढरीत वारकरी करणार भजन आंदोलन! दिंडीसाठी प्लॉट वाटपात अव्यवस्था
By रवींद्र देशमुख | Published: February 16, 2024 12:21 PM2024-02-16T12:21:01+5:302024-02-16T12:21:11+5:30
हे आंदोलन सकाळी 9.30 वा. 65 एकरसमोर केले जाणार आहे. इंगळे महाराज म्हणाले, प्लॉट वाटपाचा खूप त्रास होत आहे.
रवींद्र देशमुख/सोलापूर
सोलापूर वारीच्या काळात दिंडीच्या मुक्कामासाठी पंढरपुरातील 65 एकराच्या जागेत जे प्लॉट दिले जातात, त्या प्रक्रियेत वारकऱ्यांना होणाऱ्या त्रासाचा निषेध करण्यासाठी अखिल भाविक वारकरी मंडळ 19 फेब्रुवारी रोजी पंढरीत भजन आंदोलन करणार आहे, अशी माहिती ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे यांनी दिली.
हे आंदोलन सकाळी 9.30 वा. 65 एकरसमोर केले जाणार आहे. इंगळे महाराज म्हणाले, प्लॉट वाटपाचा खूप त्रास होत आहे. यासाठी सर्व दिंडी प्रमुखाना 14 फेब्रुवारी रोजी फॉर्म भरण्यासाठी व प्लॉट वाटपसाठी बोलावले होते. पण प्लॉट वाटप केले नाही. सर्व दिंडी प्रमुख आपापली पालखी, दिंडी सोडून त्यांचेकडे पंढरपुरला आले होते. तिथे कसलीच तयारी नव्हती. साधा एक टेबल सुद्धा नव्हता. दुसऱ्या दिवशी प्लॉट वाटप केले जाईल, असे आश्वासन दिले होते. त्याही दिवशी दुपारपर्यंत कसलीच हालचाल प्रशासन करत नव्हते, असे वातावरण पंढरपूर 65 मध्ये दिसत होते. बहुतेक तेथील अधिकारी हे विरोधी आहेत, असा संशय येत आहे.
कारण हा त्रास प्रत्येक तीन महिन्यानंतर प्रत्येक वारीला होत आहे. परंतू याची कुणीच दखल घेत नाही. लेखी निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात दिले आहे. शिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ईमेलद्वारे निवेदन दिले आहे. तरी हा त्रास बंद होत नाही. वारकरी हे संस्कृती, परंपरा सांभाळण्यासाठी दिंडी काढतात. हा त्रास सहन होत नसल्यामुळे अखिल भाविक वारकरी मंडळ आंदोलनाचे पाऊल उचलत आहे, असे महाराज म्हणाले.