पंढरीत वारकऱ्यांना फटका
By Admin | Published: July 13, 2014 01:32 AM2014-07-13T01:32:24+5:302014-07-13T01:32:24+5:30
रेल्वे कर्मचाऱ्यांचे अज्ञान; तिकीट मागितले एका गावचे दिले दुसरीकडचे
पंढरपूर : पंढरपूरमध्ये आषाढी यात्रेच्या सोहळ्यासाठी आलेल्या हजारो भाविकांनी घरी परतत असताना रेल्वेने जाणे पसंत केले आहे, परंतु रेल्वे कर्मचाऱ्यांच्या अज्ञानामुळे अनेक भाविकांना स्वत:च्या गावाऐवजी दुसऱ्याच गावचे तिकीट दिल्याने नाहक आर्थिक तसेच मानसिक भुर्दंड मोठ्या प्रमाणात सहन करावा लागला.
गुरूवारी आषाढी एकादशी असल्याने त्या दिवशी चंद्रभागेत पवित्र स्नान करून विठ्ठल-रूक्मिणीचे दर्शन घेतले. गुरूवारी सकाळपासूनच रेल्वे स्थानकावर हजारो भाविकांनी गर्दी केली होती. तिकीट खिडकीमध्ये तिकीट विक्रीचे काम करण्यासाठी नवीन कर्मचारी असल्याने त्यांना प्रत्येक गाड्यांचे क्रमांक माहीत नव्हते. यामुळे अनेक भाविकांना ज्या ठिकाणी जायचे आहे, त्या ठिकाणच्या पुढच्या गावाचे तिकीट वाटण्यात येत होते. यामुळे अनेक भाविकांना विनाकारण जादा खर्चाचा भुर्दंड सोसावा लागत होता.
असाच प्रकार दीपक उखरूड महाजन, मनोज प्रभाकर महाजन, अनिता दीपक महाजन, द्वारकाबाई नामदेव चौधरी, तुळशीदास चंद्रकांत चौधरी, योगिता तुळशीदास चौधरी, अनिल केशव चौधरी व मंगला अनिल चौधरी (रा. सर्व वाघोड, ता. रावेर, जि. जळगाव) यांच्याबरोबर घडला. या सर्वांना बुऱ्हाणपूरपर्यंत जाण्याचे तिकीट हवे होते, परंतु त्यांना भुसावळपर्यंत तिकीट मिळेल म्हणून सांगण्यात आले. त्यांनी पर्याय नसल्याने तिकीट विकत घेतले. परंतु त्यांच्या समोरच काही भाविकांना त्यांना हवे असलेले गावापर्यंतचे तिकीट दिले. यामुळे महाजन कुटुंबीयांनी परत तिकीट बदलून मागितले, परंतु तिकीट विक्री करणाऱ्यांनी त्यांना दमदाटी करून माघारी पाठविले.
संतप्त भाविकांनी पंढरपूर येथील रेल्वेचे मुख्य वाणिज्य अधिकारी एम. के. गोसावी यांच्याकडे दाद मागितली असता त्यांच्याकडेही त्यांना न्याय मिळाला नाही. यामुळे त्यांनी आषाढी यात्रेनिमित्त रेल्वे कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आलेल्या उपविभागीय वाणिज्य व्यवस्थापक ए. एस. रिसभूड यांच्याकडे धाव घेतली. ए. एस. रिसभूड यांनी महाजन यांना तिकीट विक्री केंद्रात त्या तिकीट विक्री करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे नेऊन तिकीट रद्द करून दुसरे तिकीट दिले. सर्व तिकीट विक्री करणाऱ्या कर्मचाऱ्यांना असा प्रकार करू नका, असा आदेश दिला.