रोगप्रतिकारकशक्ती कमी अन्‌ औषधांच्या साईड इफेक्टने किडनीत्रस्त रुग्णांना ॲलर्टचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 12:16 PM2021-06-17T12:16:11+5:302021-06-17T12:16:55+5:30

न घाबरण्याचा डॉक्टरांचा सल्ला : मूत्रपिंड विकाराच्या रुग्णांनी घ्यावी अधिक काळजी

Warning to Kidney Disease Patients with Side Effects of Immune Diseases and Drugs | रोगप्रतिकारकशक्ती कमी अन्‌ औषधांच्या साईड इफेक्टने किडनीत्रस्त रुग्णांना ॲलर्टचा इशारा

रोगप्रतिकारकशक्ती कमी अन्‌ औषधांच्या साईड इफेक्टने किडनीत्रस्त रुग्णांना ॲलर्टचा इशारा

Next

सोलापूर : कोरोनाच्या इतर रुग्णांपेक्षा मूत्रपिंड विकार असलेल्या रुग्णांना अधिक काळजी घ्यावी लागते. या रुग्णांची रोगप्रतिकारकशक्ती कमी असते. आजारावर उपचार करत असताना त्यांना काही औषधे द्यावी लागतात. त्याचे कमी प्रमाणात का असेना पण साईड इफेक्ट होतात; मात्र रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी त्यांना गरजेची औषधे द्यावी लागतात.

कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी स्टेरॉईड तसेच इतर औषधे दिली जातात. स्टेरॉईडचे खूप कमी तर रेमडेसिविरचे थोडे अधिक साईड इफेक्ट किडनीवर होतात. स्टेरॉईड सारखी औषधे रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी गरजेची आहेत. रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी ही औषधे द्यावी लागतात. त्याचे काही साईड इफेक्ट किडनीवर होतात असे तज्ज्ञांनी सांगितले.

किडनीचा रुग्ण पॉझिटिव्ह आल्यास त्याच्यावर वेगळा काही उपचार केला जात नाही. जो औषधोपचार इतर कोरोना बाधितांवर केला जातो त्याच पद्धतीने योग्य ते उपचार किडनीच्या रुग्णावरही केले जातात. त्रास होऊ नये म्हणून वेदनाशामक गोळीही घेण्यास सांगितली जाते.

किडनीचा रुग्ण पॉझिटिव्ह आल्यास.

  • किडनीचा आजार आधीपासून असणाऱ्या व्यक्तीला कोरोना झाल्यास त्यांनी विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे.
  • - किडनी व्यवस्थित काम करत आहे की नाही याची चाचणी (किडनी फंक्शन टेस्ट) वेळोवेळी करावी.
  • - पाणी भरपूर प्रमाणात, म्हणजे वेळोवेळी पीत राहावे. लघवी रोखून न धरता वेळीच लघवीला जावे.
  • - कोणतीही औषधी थेट आपल्या मनाने न घेता तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

-------------

हे करा...

  • - गरजेप्रमाणे पाणी पीत राहा. त्यामुळे शुद्धीकरण प्रक्रिया चांगली राहते.
  • - आंबट पदार्थ जास्त खा, त्यामुळे व्हिटॅमिन सी मिळून इन्फेक्शनचा धोका कमी होतो.
  • - नियमित व्यायाम, फिरणे आणि पुरेशी झोप घ्या. सतत एका ठिकाणी बसून राहू नका.

-------

हे करू नका

  • - ज्या औषधांनी किडनीवर परिणाम होतो ती औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नका.
  • - किडनी आणि मधुमेह हे आजार एकमेकांना पूरक असल्याने दोन्हीकडे दुर्लक्ष करू नका.
  • - किडनीचा त्रास डॉक्टरांपासून लपवू नका

--------------

फॅमिली डॉक्टरांशी बोलूनच घ्या स्टेरॉईड

किडनीच्या रुग्णाने फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घेणे हितावह ठरणार आहे. वेदना होत असल्यास कोणतीही औषधे मनाने घेऊ नका. स्टेरॉईड पण फॅमिली डॉक्टरांशी बोलूनच घ्यावे. त्यानंतर जवळच्या आरोग्य केंद्रावर जाऊन उपचार घ्यावेत व किडनी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे.

 

मूत्रपिंड विकार असणाऱ्या रुग्णांची रोगप्रतिकारशक्ती ही इतर रुग्णांपेक्षा कमी असते. डायलिसिसवर असणाऱ्या रुग्णांना नेहमी डायलिसिससाठी जावे लागते. या दरम्यान सॅनिटायझर, मास्क, फिजिकल डिस्टन्स सारखे नियम पाळताना जास्त काळजी घ्यावी लागते. यासोबतच जे इतर कोरोना रुग्णांसाठी नियम आहेत ते नियम मूत्रपिंड विकार असणाऱ्या रुग्णांसाठीही लागू आहेत. योगासन, श्वसनाचे व्यायाम, ध्यान देखील ते करु शकतात.

- डॉ. गजानन पिलगुलवार, मूत्रपिंड विकार तज्ज्ञ

-------

  • कोरोनाचे एकूण रुग्ण - 158408
  • बरे झालेले रुग्ण - 151317
  • सध्या उपचार घेत असलेले रुग्ण - 2803

Web Title: Warning to Kidney Disease Patients with Side Effects of Immune Diseases and Drugs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.