दुकानदार, भाजीविक्रेत्यांना इशारा.. कॅरीबॅग सापडली तर गुन्हे दाखल हाेणार
By राकेश कदम | Published: February 1, 2024 06:44 PM2024-02-01T18:44:15+5:302024-02-01T18:44:47+5:30
महापालिका पुन्हा करणार कारवाई : आराेग्य निरीक्षकांना दिले उदिष्ट
साेलापूर : महापालिका पुन्हा कॅरीबॅग आणि थर्माकाॅल विक्रेते, वापर करणाऱ्या मंडळींवर कारवाई करणार आहे. आराेग्य निरीक्षकांना दंडात्मक कारवाईचे उदिष्ट देण्यात आले आहे. कॅरीबॅग, थर्माकाॅल सापडले तर दुकानदार, भाजी विक्रेते, फळविक्रेते यांच्यावर गुन्हे दाखल हाेतील. कॅरीबॅग विक्रेत्यांचा शाेध घेउन पाेलिस कारवाई हाेईल, असा इशारा मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार यांनी गुरुवारी दिला.
बिराजदार म्हणाले, महापालिका आयुक्त शितल तेली उगले यांनी प्लास्टिक बंदी कारवाईबाबत नुकतीच आढावा बैठक घेतली. शहरात वर्षभरात १०४ जणांवर कारवाई झाली आहे. या १०४ जणांकडून पाच लाख ५० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. शुक्रवारपासून पुन्हा शहरात कारवाई सुरू हाेणार आहे. दुकानदारांकडे कॅरीबॅग सापडली तर ५ हजार रुपये दंड हाेताे. अनेकजण हा दंड भरुन पुन्हा कॅरीबॅगचा वापर करीत असल्याचे दिसून येते.
मनपा आयुक्तांनी अशा आस्थापनांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. महापालिकेच्या आराेग्य निरीक्षकांनी मंगल कार्यालये, दुकाने, भाजी विक्रेते, फळविक्रेते अशा विविध आस्थापनांची तपासणी करावी. या तपासणीचा अहवाल उपायुक्तांना सादर करावा. यात हलगर्जीपणा केल्यास आराेग्य निरीक्षकांवर कारवाई हाेईल, असा इशारा बिराजदार यांनी दिला.