शाळा, कॉलेजच्या ठिकाणी मुलींना त्रास देणाºया मजनूंची होणार धुलाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 12:38 PM2019-07-02T12:38:18+5:302019-07-02T12:40:30+5:30
शहर पोलीस अलर्ट : छेड काढणाºया रोडरोमिआेंवर ‘दामिनी’ची करडी नजर
संताजी शिंदे
सोलापूर : शहरातील सात पोलीस ठाण्याच्या हद्दीत शाळा, कॉलेज आणि बाजारपेठांच्या ठिकाणी मुली व महिलांची छेडछाड करणाºया रोडरोमिओंवर पोलीस आयुक्तालयाच्या ‘दामिनी’ पथकाची करडी नजर असणार आहे. पाठीमागे लागणे, छेड काढणे आदी प्रकाराबाबत तक्रार आल्यास अशा मजनूंची जबरदस्त धुलाई होणार आहे. मुली व महिलांनी याबाबत पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन दामिनी पथकाच्या वतीने करण्यात आले आहे.
शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत एकूण सात पोलीस ठाणे आहेत. फौजदार चावडी पोलीस स्टेशन, जेलरोड पोलीस स्टेशन, सदर बझार पोलीस स्टेशन, विजापूर नाका पोलीस स्टेशन, सलगर वस्ती पोलीस स्टेशन, एमआयडीसी पोलीस स्टेशन, जोडभावी पेठ पोलीस स्टेशन या हद्दीत ठिकठिकाणी मुला-मुलींची, काही ठिकाणी फक्त मुलींच्या शाळा, कॉलेज, होस्टेल व कोचिंग क्लासेस आहेत. २०१९-२० च्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली आहे. सध्या शहरातील शाळा कॉलेजमध्ये विद्यार्थिनी जात आहेत.
शहरातील काही शाळांसमोर रोडरोमिओंचे टोळके उभे राहते. मुलींची छेड काढणे, कॉमेंट करणे, पाठलाग करणे आदी प्रकार घडत असतात. या प्रकाराला आळा घालण्यासाठी दामिनी पथकाची खास नेमणूक करण्यात आली आहे.
आठ मोटरसायकलीवर १६ दामिनीचे पथक शहरातील प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीत गस्त घालत आहेत. एखाद्या शाळेजवळ किंवा कॉलेजच्या आसपास छेडछाड होत असेल तर तेथील रोडरोमिओंना हुसकावून लावले जाते. गरजेनुसार तत्काळ संबंधित पोलीस ठाण्याचा पोलीस फोर्स बोलावून रोडरोमिओंची धुलाई केली जाते. शाळेसाठी व अन्य कामासाठी बाहेर पडणाºया मुली व महिलांसाठी हे पथक सकाळी ८ ते रात्री ८ पर्यंत शहरातून गस्त घालत आहेत. प्रत्येक शाळा व कॉलेजमध्ये पथक जाऊन संबंधित मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थिनींना भेटून मार्गदर्शन करीत आहेत.
रोडरोमिओंचा त्रास होत असेल तर अन्याय सहन न करता पोलिसांना संपर्क साधण्यास सांगत आहेत.
आम्ही तुमच्यासोबत आहोत : हर्षा कांबळे
- आज आपण २१ व्या शतकात आहोत, मुलगी आहात धाडस कसं करायचं असा विचार करून अन्याय सहन करू नका. रोडरोमिओंचा किंवा अन्य कोणत्याही प्रकारचा त्रास होत असेल तर तत्काळ पोलीस आयुक्तालयाच्या १०० नंबरवर किंवा ०२१७-२७४४६०० वर संपर्क साधा. पोलीस काही मिनिटात तुमच्या पर्यंत पोहोचतील. वेळीच रोडरोमिओंच्या अपवृत्तीला आळा घाला, अन्यथा भविष्यात त्याचे वेगळे परिणाम भोगावे लागतात. मुलींनो धाडसी व्हा आम्ही तुमच्यासोबत आहोत, असे आवाहन दामिनी पथकाच्या प्रमुख फौजदार हर्षा कांबळे यांनी केले आहे.
मुलींनी अन्यायाचा विरोध केला पाहिजे, भीती बाळगून गप्प बसणे हा त्यावर उपाय नाही. शिक्षक, मुख्याध्यापकांना आपली समस्या सांगावी, अन्यथा आयुक्तालयाच्या हेल्पलाईनवर संपर्क साधून माहिती द्यावी. पोलिसांचे दामिनी पथक संबंधितांचा बंदोबस्त करतील.
-प्रेसनजीत दुपारगुडे, पोलीस निरीक्षक, महिला तक्रार समस्या निवारण केंद्र
विविध शाळा, महाविद्यालयांच्या गेटसमोर रोडरोमियांचा धिंगाणा चाललेला असतो. त्यामुळे विद्यार्थिनींची सुरक्षा धोक्यात आली आहे. शाळा-कॉलेज भरताना, सुटताना गेटसमोर आणि परिसरात पोलिसांची गस्त असावी. पोलिसांच्या लाठीचा प्रसाद मिळाल्याशिवाय हे रोडरोमिओ सुधारणार नाहीत.
-राज पाटील, अध्यक्ष, महाराष्ट्र वीरशैव युवक आघाडी