भंगार बसेस महिलांसाठी पिंक टॉयलेट करणार; सोलापूर महापालिकेचा वेगळा उपक्रम
By Appasaheb.patil | Updated: November 24, 2022 14:28 IST2022-11-24T14:28:05+5:302022-11-24T14:28:46+5:30
या उपक्रमासाठी सामाजिक संस्था, संघटनांची मदतीबरोबरच सीएसआर फंड लागणार आहे, तोही उभा करण्यासाठी महापालिका चाचपणी करीत आहेत.

भंगार बसेस महिलांसाठी पिंक टॉयलेट करणार; सोलापूर महापालिकेचा वेगळा उपक्रम
सोलापूर : शहरात महिला व पुरुषांसाठी टॉयलेटची संख्या म्हणावी तशी नाही. शिवाय आहेत त्या टॉयलेटची अवस्था फारच वाईट आहे. तर या सर्व समस्यांवर तोडगा काढण्यासाठी महापालिका प्रशासन आता कामाला सुरुवात करणार आहे. परिवहन विभागाच्या भंगार बसेसचे रूपांतर आता महिलांसाठी पिंक टॉयलेट करण्यात येणार आहे. तसेच, शहरातील आहेत, त्या टॉयलेटची अवस्था सुधारण्यासाठी प्रयत्न होणार आहेत.
दरम्यान, या उपक्रमासाठी सामाजिक संस्था, संघटनांची मदतीबरोबरच सीएसआर फंड लागणार आहे, तोही उभा करण्यासाठी महापालिका चाचपणी करीत आहेत. आयुक्त शीतल तेली-उगले यांनी एकूणच परिवहन विभागाचा आढावा घेतला. चालू व बंद बसेसबाबतची माहिती जाणून घेतली. यावेळी पालिकेचे अधिकारी व परिवहन विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. जेएनयूआरएम उपक्रमातून घेण्यात आलेल्या ९९ बसेस संदर्भातील विषय न्यायालयीन प्रक्रियेत आहे. त्यामुळे त्याविषयी आताच काही निर्णय घेऊ शकत नसल्याचेही आयुक्तांनी सांगितले.
पुणे पॅटर्न राबविणार सोलापुरात...
पुण्यात महापालिकेने एका कंपनीची मदत वापरातून बाद झालेल्या जुन्या बसचा वापर करून लेडीज टॉयलेटची निर्मिती केली आहे. या बसमध्ये वेस्टर्न आणि इंडियन दोन्ही प्रकराचे टॉयलेट तयार करण्यात आली आहेत. हा पुणे पॅटर्न सोलापुरात राबविण्यात येईल का? याबाबत माहिती घेण्यात येत आहे.
महापालिका आयुक्तांनी घेतला परिवहनचा आढावा
परिवहन विभागाला ऊर्जावस्थेत आणण्यासाठी निधी, पैशाची गरज आहे. सध्या महापालिकेकडे आवश्यक तो निधी नाही, तरीही लोकांच्या दृष्टीने परिवहनची सेवा सुरू होणे महत्त्वाचे असल्याने त्याला पैसे देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, अशी माहिती आयुक्त शीतल तेली-उगले यांनी दिली.
२० चालू तर, ५९ बसेस दुरुस्तीअभावी बंद
परिवहन विभागांतर्गत सध्या शहरात विविध मार्गांवर २० बसेस धावत आहेत. त्यातून परिवहनला चांगले उत्पन्न मिळत आहे. उर्वरित ५९ बसेस दुरुस्तीअभावी बंद आहेत, त्या लवकर कशा चालू करता येतील यासाठी महापालिका प्रशासन प्रयत्न करीत आहेत.