बळिराजाच्या मशागतीवर ‘कॅटल इग्रेटचं’ वॉच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:41 AM2021-03-13T04:41:17+5:302021-03-13T04:41:17+5:30
पांढऱ्या रंगाच्या बगळ्या पक्षांचा शिवारात राबता वाढला आहे. इंग्रजीत कॅटल इग्रेट नावाने संबोधणाऱ्या बगळ्यांना गायबगळे अथवा ढोरबगळे या नावाने ...
पांढऱ्या रंगाच्या बगळ्या पक्षांचा शिवारात राबता वाढला आहे. इंग्रजीत कॅटल इग्रेट नावाने संबोधणाऱ्या बगळ्यांना गायबगळे अथवा ढोरबगळे या नावाने ओळखले जाते. जमिनीवरचे किडे हे त्यांचे प्रमुख खाद्य. नाकतोडे, माशा आदी किटकांचा त्यांच्या खाद्यात समावेश असतो. किटकांबरोबर बेडूक, गोम, विंचू, लहान सरडे आदी प्राण्यांवरही हे पक्षी ताव मारतात. त्यामुळे हे पक्षी समूहाने शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्याच्या आसपास फिरत राहतात.
सध्या हे पक्षी नांगरट सुरू असणाऱ्या शेतात हजेरी लावताना दिसत आहेत.
बळिराजाशी अतूट नाते
शेतीप्रधान अर्थव्यवस्थेत अनेक रूढी- परंपराबरोबर जीवसृष्टीचा बळिराजाशी घनिष्ट संबध आहे. अनेक जीव शेतकऱ्यांच्या रोजच्या कामातून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपला उदरनिर्वाह करतात. त्यापैकी बैलांच्या जागी ट्रॅक्टर आल्याने आता हे बगळे ट्रॅक्टरच्या मागे नांगरताना गर्दी करत असल्याचे दिसत आहे.
सूर्यास्तावेळी सर्रास टोळक्याने आढळतात
संध्याकाळी सूर्यास्तावेळी बगळे टोळके करून किंवा तिरक्या ओळी करून झाडांवरील घरट्याकडे परतताना दिसतात. एकूणच निसर्गचक्रातील शेतकरी व गायबगळे यांचे नात अतूट आहे.
वेगवेगळ्या पक्ष्यांचा जीवनक्रम निसर्गातील वेगवेगळ्या घटकांवर प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे अवलंबून असतो. त्यातील एक कॅटल इग्रेड व जनावरे शेतीच्या मशागतीच्या माध्यामातून भक्ष्य शोधतात व आपली उपजीविका करतात, असे पक्षिनिरीक्षक अरविंद कुंभार यांनी सांगितले.
फोटो लाईन :::::::::::::::::::::::::
शेतात मशागत करणाऱ्या ट्रॅक्टरच्या मागे टोळक्याने फिरत असलेले पांढरे बगळे.