नायलॉन मांजा तयार करणाऱ्यांसह विक्री करणाऱ्यांवरही वॉच
By शीतलकुमार कांबळे | Published: August 31, 2023 03:54 PM2023-08-31T15:54:05+5:302023-08-31T15:54:21+5:30
दर महिन्याला आढावा बैठक : वनविभाग, महापालिकेवरही जबाबदारी
सोलापूर : राज्यात नायलॉन मांज्यामुळे पक्षांसोबतच मानसंचाही अपघात होत आहे. यावर प्रतिबंध घालण्यासाठी महाराष्ट्र शासनाने विविध विभागांकडे जबाबदारी दिली आहे. त्यामुळे नायलॉन मांजा तयार करणारे, होलसेल विक्रेते यांच्यासह छोट्या दुकानांवरही आता वॉच असणार आहे. याबाबत शासन आदेश प्रसिद्ध करण्यात आला आहे.
नायलॉन मांजा वापरू नये यासाठी शाळा कॉलेजमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. याची जबाबदारी शालेय शिक्षण व उच्च तंत्र शिक्षण विभाग यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. सामान्य नागरिकांचा यासंबंधी काही तक्रारी दूर करण्यासाठी स्वतंत्र कक्ष व टोल फ्री नंबर सुरू करण्यात येणार आहे.
मांज्याचं पुरवठा आणि वापर याच्यावर आळा घालण्यासाठी महिन्यातून एकदा आढावा बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्था, पोलीस विभाग, जिल्हा परिषद व वन विभागाचे अधिकारी यांचा सहभाग असणार आहे. महाराष्ट्रामध्ये नायलॉन मांजवर बंदी असली तरी इतर राज्यातून हा मांजा राज्यात येऊ शकतो. तो येऊ नये यासाठी राज्याच्या सीमा वर चेक पोस्ट तयार करण्यात येणार आहे. नायलॉन मांजचे उत्पादन होऊ नये व असे काही कारखाने असतील तर ते शोधून काढावे त्यासाठी उपप्रादेशिक प्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे.
सोलापुरात गल्लोगल्ली विक्री
सोलापूर शहरात साध्या माझ्यापेक्षा नायलॉन म्हणण्याचा वापर अधिक होतो. शहरांमध्ये सुमारे सात होलसेल विक्रेते नायलॉन मांजाची विक्री करतात. या होलसेल दुकानातून शहरात सुमारे चारशे दुकानदार येतात. शहरातील गल्लोगल्ली मांजाची विक्री करतात. या मांज्यामुळे पक्षांसह माणसाच्या जीवितेलाही धोका आहे. त्यामुळे यावर प्रतिबंध घालण्याची गरज असल्याचे मानक वन्यजीव रक्षक भरत छेडा यांनी सांगितले.