बेगमपूर पुलावरील पाणी ओसरू लागले; मंगळवेढा - पंढरपूर महामार्ग सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2020 12:51 PM2020-10-17T12:51:39+5:302020-10-17T13:06:48+5:30
माण नदीवरील पूल खुला, प्रशासनावरचा ताण झाला कमी
मंगळवेढा : उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग कमी केला आहे, यामुळे माचणूर -बेगमपूर पुलावरील पाणी मोठ्या प्रमाणावर ओसरू लागले आहे़ रविवारी दुपारी पुलाची राष्ट्रीय महामार्गच्या अभियंता पथकाकडून तपासणी केली जाणार आहे, वाहतुकीसाठी कोणताही धोका नसल्याबाबत त्याचा अहवाल प्राप्त होताच रविवारी सायंकाळपासून अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी सोलापूर-कोल्हापूर हा महामार्ग खुला होण्याची शक्यता तहसीलदार स्वप्निल रावडे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केली. दरम्यान, महापूराचे पाणी ओसरल्याने पोलीस व महसूल प्रशावसनावरचा ताण कमी झाल्याने त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
उजनी व वीर धरणातून भीमेच्या पात्रात जवळपास तीन ते चार लाख क्युसेक पाणी विसर्ग असल्याने भीमा नदीला महापूर आला होता. गेले तीन दिवस भीमा नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहे़ बेगमपूर येथील पुलावर पहिल्यांदाच पाच फुटापेक्षा जास्त पाणी वाहिले यामुळे गेले तीन दिवस हा पूल वाहतुकीसाठी बंद आहे. या दरम्यान एस.टी बंद झाल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. काही प्रवाशांनी कर्नाटक राज्यातून येऊन आपली घरे गाठली. मात्र हत्तुर येथील पुलावरून ही पाणी वाहू लागल्याने झळकीमार्गे होणारी वाहतूक ठप्प झाली आहे. या पुलावरील पाणी शनिवार पहाटेपासून कमी होत आहे, तरीही रविवार सकाळपर्यत पुर्णत: पाणी कमी झाल्यानंतर तात्काळ राष्ट्रीय माहामार्गच्या अभियंता पथकाकडून तपासणी केली जाणार आहे त्यानंतर चारकी वाहनांना पूलावरून प्रवेश दिला जाणार आहे.
रविवारी पुलावरील पाणी झाल्यावर तपासणीनंतर प्रथमत: दहा टन वजनाची मालवाहतूक गाडी सोडण्यात येणार आहे़ तद्नंतर टप्प्याटप्प्याने अनुक्रमे २० ते ५० टन वजनाची अवजड वाहने सोडली जाणार आहेत . महापूर कालावधीत पूलावरून प्रवेशकरून कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी तहसीलदार स्वप्निल रावडे व पोलीस निरीक्षक जोतिराम गुंजवटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक खटके, सपोनि किरण उंदरे यांनी नदीच्या दोन्ही काठावर पोलीस व तलाटी यांचे पथके रात्रंदिवस कार्यरत ठेवली आहेत. पूल रिकामा होताच रविवारी सायंकाळपासून मंगळवेढा आगाराने सोलापूर मार्गावर एस.टी बसेस सोडण्यासाठी सज्ज ठेवल्या आहेत अशी माहिती आगरप्रमुख गुरुनाथ रणे यांनी सांगितले़ दरम्यान सिद्धेवाडी येथील माण नदीवरील पाणी ओसरल्यानंतर मंगळवेढा-पंढरपूर मार्गावरील वाहतूक सुरू करण्यात आली आहे.
गेल्या तीन दिवसांपासून पंढरपूर व सोलापूर या मार्गावर एस.टी बसेस धावू शकली नाही. परिणामी तीन दिवसात या मार्गावरील १०० हुन फेºया रद्द झाल्या होत्या, याचा अर्थिक उत्पन्नावर परिणाम झाला आहे. पूराच्या पाण्याने वेढलेले तामदर्डी गावही रविवारी मुक्त होणार आहे. नदीकाठावरील भागात शिरलेले पाणी ओसरत असून आता दुर्गंधी युक्त वासाने नागरीक त्रस्त झाले आहेत. पिकांचे मोठे नुकसान झाले आहे़ रोगराई टाळण्यासाठी ग्रामपंचायतीने गावामधून फवारणी व पावडर टाकणे गरजेचे आहे. सध्या वाहतूक बंद असल्याने विविध राज्यातील शेकडो वाहने खोळंबली आहेत