सोलापुरात पाण्याची बोंबाबोंब; सर्वपक्षीय नेते एकत्र येणार, मोठे जनआंदोलन उभारणार
By Appasaheb.patil | Published: March 6, 2023 02:39 PM2023-03-06T14:39:45+5:302023-03-06T14:40:19+5:30
शहरात तब्बल २५ दिवस चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता,
आप्पासाहेब पाटील
सोलापूर : सोलापूर शहर व हद्दवाढ भागात २५ दिवस उलटून गेले तरी देखील सुरळीत पाणीपुरवठा करण्यासंदर्भात महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून योग्य त्या उपाययोजना करण्यात येत नाहीत. पाण्याचा खेळखंडोबा सुरूच आहे. पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास मोठं आंदोलन उभा करण्याचा इशारा माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी दिला आहे. दरम्यान, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनीही मागील आठवड्यात सर्वपक्षीय नेत्यांना एकत्र घेऊन आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.
पाणी द्या.. पाणी द्या.. नाहीतर खुर्च्या. खाली करा.. या विविध घोषणा देत महापालिका आयुक्त कार्यालयासमोर भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक तथा माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली महिलांसह नागरिकांनी ठिय्या आंदोलन करून माठ फोडलं होते. शहरात तब्बल २५ दिवस चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, परंतु २५ दिवस उलटून गेले तरी पालिका प्रशासनाच्या पाणीपुरवठा विभागाकडून सुरळीत पाणीपुरवठा करण्यासंदर्भात खेळखंडोबा सुरूच आहे. यामुळे माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी पुन्हा जन आंदोलन छेडण्याची तयारी दर्शविली आहे. प्रभाग क्रमांक तीन मधील भवानी पेठ व जोडभावी पेठ या परिसरात चार दिवसानंतर ही पाचव्या दिवशीही पाणी उशीरा पुरवठा तेही अंत्यंत कमी दाबाने होत आहे, अशी परिस्थिती असताना आयुक्त , संबंधित अधिकारी व खातेप्रमुख मोबाईल व्दारे फोन केलं असता ते फोन उचलत नाहीत. पाणी पुरवठा तेही सुरळीत करत नाहीत. उच्च दाबानेही पाणी पुरवठा करीत नाहीत अश्या संबंधित अधिकाऱ्यांना व खातेप्रमुख यांना बडतर्फ करा, मानधनावर काम करणारं खातेप्रमुखांना सेवेतुन कमी करा, शासनाकडून सक्षम अधिकाऱ्यांची नेमणुक करा, अन्यथा प्रशासन प्रमुख म्हणून आयुक्त यांच्या विरोधात शासनाकडे आयुक्त हटाव ही मोहीम जन आंदोलनव्दारे छेडण्यात येईल असा इशारा दिला आहे.