सांगोला तालुक्यातील ८२ गावांवर ओढावणार जलसंकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:15 AM2021-07-03T04:15:26+5:302021-07-03T04:15:26+5:30
सांगोला तालुक्यातील ८२ गावांसाठी आशिया खंडात सर्वात मोठी शिरभावी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना २००२ नंतर पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाली. ...
सांगोला तालुक्यातील ८२ गावांसाठी आशिया खंडात सर्वात मोठी शिरभावी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना २००२ नंतर पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाली. तेव्हापासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून ठेकेदारामार्फत ही योजना चालवली जात आहे. त्यांची मुदत गतवर्षी मार्च २०२० ला संपली होती. त्यामुळे पंचायत समिती सभापती राणी कोळवले यांनी १२ जून २०२० रोजी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणनेच ही योजना पुढे ३ वर्षे चालवावी असा ठराव करून तो त्यांना पाठवून दिला होता. तद्नंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून ही योजना चालवण्यासाठी निविदा काढली असून त्याची मुदत १२ नोव्हेंबर २०२१ ला संपणार आहे. असे असताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने १५ जुलैपर्यंतच योजना चालविण्याचा निर्णय घेतल्यामुळे ही योजना कोण चालवणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
अशातच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेने १ ते ७ जूनपर्यंत ही योजना बंद ठेवली होती. योजना बंद असल्याची दखल घेऊन आ. शहाजीबापू पाटील यांनी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे पत्रव्यवहार करून ही योजना कायमस्वरूपी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणनेच चालवावी अशी मागणी केली होती. त्यानुसार त्यांनी योजना चालवण्यासाठी सुरुवात केली असताना अचानक महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधीक्षक अभियंता मुंबई यांनी १५ जुलैपर्यंत योजना चालवावी, असे मुख्य कार्यकारी अधिकारी सोलापूर यांना कळविले आहे.
जलसंकटाला तोंड द्यावे लागणार
वीज वितरण कंपनीकडून या योजनेच्या वार्षिक ३ कोटी ५० रुपये वीज बिलात ५० टक्के सवलत देऊन १ कोटी ५० लाख रुपये परतावा दिला तरी सुमारे २ कोटी रुपये कोठून उपलब्ध करायचे म्हणून सोलापूर ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून ही योजना तोट्यात असल्यामुळे चालविण्यास यापूर्वीच नकार दिला आहे. त्यामुळे आ. शहाजीबापू पाटील यांनाच आता पाणीपुरवठा मंत्र्याकडे ही योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेने चालवावी की ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे चालवायला द्यायची, यासाठी तत्काळ पावले उचलावी लागणार आहेत. अन्यथा १५ जुलैनंतर सांगोला तालुक्याला जलसंकटाला तोंड द्यावे लागणार, हे मात्र निश्चित.
जीएसटी वगळता ५ कोटी ६० लाखांचा खर्च
शिरभावी प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेला ग्रामपंचायतीकडून पाणी मागणीनुसार सुमारे १ कोटी ८० लाख रुपये उत्पन्न मिळते. तर सुमारे ३ कोटी ५० लाख रुपये वीज बिल, ठेकेदाराकडून ही योजना चालण्यासाठी वर्षाकाठी १ कोटी २० लाख रुपये, तुरटी, टीसीएल पावडर १५ लाख रुपये, पाटबंधारे विभाग २७ लाख रुपये पाणीपट्टीसह इतर असे वर्षाकाठी सुमारे ५ कोटी ६० लाख (जीएसटी) वगळून खर्च येतो. उत्पन्न वजा जाता इतर निधी कोठून उपलब्ध करायचा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे शिरभावी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेचे भवितव्य अंधारातच आहे.
फोटो ओळ :::::::::::::::::::
शिरभावीसह ८२ गावच्या प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेचे संग्रहित छायाचित्र.