नदीकाठच्या ५१ गावांच्या पिकात पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:23 AM2021-09-27T04:23:39+5:302021-09-27T04:23:39+5:30
अक्कलकोट : तुळजापूर व अक्कलकोट तालुक्यांत परतीच्या मुसळधार पावसाने दैना उडवून दिली आहे. परिणामत: कुरनूर धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी ...
अक्कलकोट : तुळजापूर व अक्कलकोट तालुक्यांत परतीच्या मुसळधार पावसाने दैना उडवून दिली आहे. परिणामत: कुरनूर धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येत आहे. यामुळे हजारो हेक्टरमधील तूर, ऊस, उडीद, केळी ही पिके पाण्यात कुजत असून, कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. नैसर्गिक फटका बसण्याचे यंदा दुसरे वर्ष आहे. या नैसर्गिक संकटापुढे नदीकाठच्या ५१ गावांतील बळिराजा हतबल झाला आहे.
मागील वर्षाप्रमाणे यंदाही परतीच्या पावसाने धुमाकूळ घातले आहे. कधी अक्कलकोट, तर कधी तुळजापूर तालुका मुसळधार पावसाचा अनुभव घेत आहे. यामुळे कुरनूर धरणात मोठ्या प्रमाणात पाणी साठा होत आहे. परिणामी बोरी नदीपात्रात रोज १८००-२०० क्युसेक पाणी सोडले जात आहे. याचा अंदाज नेमकं पाटबंधारे विभागाला लागताना दिसत नाही. नदी वारंवार दुथडी भरून वाहते आहे. परिणामी रात्रंदिवस नदीकाठच्या शेतकऱ्यांचे शेतातील ऊस, तूर, उडीद, केळी, सोयाबीन ही पिके पाण्यात थांबून आहेत. यामुळे पिके कुजत आहेत. बळिराजा चिंतातुर झाला आहे.
महसूल विभागाकडून पिकांचे पंचनामे होण्यासाठी एकाच दिवसांत सलग ६५ मिलिमीटर पाऊस होणे नियमाने बंधनकारक आहे. असे जरी असले तरी तुळजापूर तालुक्यातून सोडण्यात आलेल्या पाण्याचे येथील पावसाच्या पाण्यात गृहीत धरले जाते की नाही ? असा सवाल शेतकऱ्यांतून उपस्थित केला जात आहे.
---
या गावाला सर्वाधिक धोका
मोठ्याळ, चुंगी, किणी, पितापूर, सांगवी, ममनाबद, निमगाव, काळेगाव, गौडगाव खुर्द, रामपूर, उमरगे, कंठेहळळी, मिरजगी, बिंजगेर, संगोगी (ब.), रुद्देवाडी, आंदेवाडी(ज.), बबलाद,
---अक्कलकोट तालुक्यात परतीचा मुसळधार पाऊस आहे. तसेच तुळजापूर तालुक्यातसुद्धा पाऊस होत आहे. यामुळे कुरनूर धरणात मोठ्या प्रमाणात पाणी साठा होत आहे. नदीपात्रात १८००-२००० क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रशासनसुद्धा सतत सतर्क झाले आहे. वरिष्ठांच्या सूचनेनंतर नुकसानीचे पंचनामे करण्यात येतील.
- बाळासाहेब सिरसाट
तहसीलदार
----
फोटो : २६ ममदाबाद
ममनाबद येथील सोयाबीन पीक परतीच्या पावसाच्या पाण्यात कुजत आहे.