सोलापूर शहरात मुसळधार पाऊस; घराघरात शिरलं पाणी.. सोलापूरकरांची अवस्था केविलवाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 01:13 PM2019-09-26T13:13:46+5:302019-09-26T13:16:20+5:30
जेसीबीनं भिंती फोडून निचरा.. साप शिरल्यानं जीव घाबराघुबरा !
सोलापूर : शहरात सलग चौथ्या दिवशी बुधवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. गटारी तुंबल्याने घरांमध्ये पाणी शिरल्याच्या शेकडो तक्रारी आल्या होत्या. महापालिकेच्या विभागीय कार्यालयांकडून वेळेवर प्रतिसाद न मिळाल्याने कल्याण नगर, कुमार चौकातील लोक संतापले होते. बाळे परिसरातील वसाहती, विजापूर नाका झोपडपट्टी, जुळे सोलापुरातील शिवरत्न नगर, द्वारकाधीश मंदिर परिसरातील घरांमध्ये पाणी शिरून घरगुती साहित्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. लोक रडकुंडीला आले होते.
सायंकाळी साडेसहाच्या सुमाराला पावसाला सुरुवात झाली. रात्री ८.३० पर्यंत पावसाचा जोर कायम होता. सखल भागात पाणी साचले होते. सात वाजण्याच्या सुमाराला घरांमध्ये पाणी शिरल्याच्या तक्रारी यायला सुरुवात झाली. कुमार चौक, विजापूर नाका झोपडपट्टी परिसरात नाले तुंबले होते. महापालिकेचे कर्मचारी नाल्याच्या स्वच्छतेमध्ये गुंतले होते.
काडादी चाळ, कुमार चौक, फॉरेस्ट येथील घरांमध्ये पुन्हा पाणी शिरले होते. संतप्त झालेले लोक रस्त्यावर उतरले. सात रस्ता ते स्टेशन रोड बंद करण्यात आला होता. नागरिक ऐकायला तयार नव्हते. महापालिकेचे कर्मचारी नाल्यातून वेगाने पाणी जावे, यासाठी स्वच्छतेची कामे करीत होते. परंतु, महापालिका प्रशासनाचे अधिकारी न आल्याने लोकांचा रोष वाढला होता.
महापालिका आयुक्त दीपक तावरे, सहायक अभियंता युसूफ मुजावर कुमार चौकात आले. कर्मचाºयांना सूचना देऊन तातडीने रस्ता मोकळा करायला लावला. यानंतर आयुक्तांनी कंबर तलावाजवळील पोस्टल कॉलनी टिळक नगर, ब्रह्मदेव नगर या भागात जाऊन पाहणी केली. रात्री १२ वाजेपर्यंत आयुक्त तावरे विविध भागात जाऊन कामांची पाहणी करीत होते.
शहरातील न्यू बुधवार पेठ, साठे चाळ, रमाबाई आंबेडकर नगर, मंत्री-चंडक परिसर, मुकुंद नगर, मुनिसिपल कॉलनी या भागात घरांमध्ये पाणी शिरले होते.
गौतम नगरातील कट्टा जेसीबीने फोडला
- जुना विजापूर नाका झोपडपट्टी नंबर एक येथील गौतम नगर भागातील घरांमध्ये पाणी शिरले. घरातील साहित्याचे मोठे नुकसान झाल्याने लोक वैतागले होते. येथील नगरसेविका पूनम बनसोडे यांनी महापालिकेच्या अधिकाºयांना फोन करून जेसीबी मागविला. जेसीबीने नाल्याच्या बाजूला असलेला कट्टा रात्री आठच्या सुमाराला फोडला. त्यामुळे तुंबलेल्या पाण्याला वाट मिळाली. या नाल्यात आजोरा व कचरा पडला आहे. महापालिकेच्या विभागीय कार्यालयाने हा कचरा आणि आजारो हटविला नाही. त्यामुळे गटाराचे पाणी तुंबले आणि घरांमध्ये शिरल्याचा आरोप नागरिकांनी केला.
कुमार चौकात पुन्हा पाणी का तुंबले?
- रविवारी रात्री झालेल्या पावसामुळे कुमार चौकातील नाला तुंबला होता. कोनापुरे चाळ, काडादी चाळीतील घरात पाणी जाऊन मोठे नुकसान झाले. महापालिकेने या नाल्याच्या सफाईचे काम हाती घेतले. नाल्यातून गाद्या, कपडे, कचरा, माती असे बरेच साहित्य काढले. विभागीय कार्यालयातील कर्मचाºयांनी ते नाल्याच्या बाजूला ठेवले होते. बुधवारी रात्री झालेल्या पावसात हा कचरा पुन्हा नाल्यात आला. त्यामुळे पाणी तुंबल्याची तक्रार काँग्रेसच्या नगरसेविका वैष्णवी करगुळे यांनी केली.
कल्याण नगर येथील घरांमध्ये साप अन् कचरा
- कल्याण नगर भाग १ येथील ५० ते ६० घरांमध्ये गटाराचे पाणी शिरले. गणेश नगर भागातील ड्रेनेज लाईनच्या पाईपलाईनचे तोंड कल्याण नगरजवळ आहे. पावसामुळे या पाईपलाईनमधील घाण पाणी बाहेर पडून घरांमध्ये शिरले. या गटाराच्या पाण्यासोबत कचरा, सापही नागरिकांच्या घरामध्ये आले होते. घरगुती साहित्याचे मोठे नुकसान झाले होते. पावसाचा जोर ओसरल्यानंतर नागरिक हताश झाले होते. महापालिकेची यंत्रणा रात्री १० वाजेपर्यंत या भागात पोहोचली नव्हती, अशी तक्रार आतिश दळवी, अजित शहापूरकर, आकाश शिंदे यांनी केली. नागरिकांनी एका नगरसेवकाला फोन लावला. तुम्ही मला दिली नाहीत. आता कशाला फोन करताय, असे उत्तर दिल्याची तक्रार नागरिकांनी केली.