मोठी बातमी; ‘उजनी’चे पाणी औज बंधाऱ्यात पोहोचले; एप्रिल, मे महिन्यांची चिंता मिटली
By Appasaheb.patil | Published: March 28, 2023 02:34 PM2023-03-28T14:34:53+5:302023-03-28T14:36:12+5:30
उजनी धरणातून सोलापूर शहरासाठी सोडलेले पाणी औज धरणात पोहोचले.
आप्पासाहेब पाटील, सोलापूर: उजनी धरणातून सोलापूर शहरासाठी सोडलेले पाणी औज धरणात पोहोचले. ऐन उन्हाळ्यात औज बंधाऱ्यात पाणी आल्याने शहरातील पाणीटंचाईचा प्रश्न सध्या तरी उद्भवणार नसल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. औज परिसरातील वीजपुरवठा बंद करण्यासंदर्भात आयुक्तांनी विजयपूर व सोलापूरचे जिल्हाधिकारी यांना पत्रव्यवहार केला होता, त्यानुसार पाणी उपसा करणाऱ्या शेतकऱ्यांचा वीजपुरवठा बंद करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, सोलापूर शहराला मुबलक प्रमाणात पाणीपुरवठा व्हावा, यासाठी उजनी धरणातून औज धरणासाठी पाणी सोडले होते. ते पाणी सोमवारी औजमध्ये पोहोचले. एकीकडे शहरात सहा-सहा दिवसांआड होणाऱ्या पाणीपुरवठ्यातही कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही त्यासाठी महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग प्रयत्न करीत आहे. उजनी धरणातून सोलापूरपर्यंत पाणी येईपर्यंत ६७ पाणीपुरवठा योजना आहेत, या योजनांतही ते पाणी जात असल्याचेही सांगण्यात आले. या पाण्यामुळे पाणीटंचाई मिटणार असून, सुरळीत व मुबलक होणार असल्याचे सांगितले जात आहे. सध्या उजनीतील पाण्याची पातळी कमी होत चालली आहे, त्यामुळे मेनंतर सोलापुरात पाणीटंचाई भासणार असल्याचे बोलले जात आहे. उन्हाळ्यात नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"