उजनीतून सोडलेले पाणी शेतकरी हितासाठी की वीजबिल वसुलीसाठी? शेतकऱ्यांचा संतप्त सवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:26 AM2021-08-22T04:26:39+5:302021-08-22T04:26:39+5:30
पावसाळा सुरू होऊन अडीच ते तीन महिन्यांचा कालावधी लोटला असला तरी पंढरपूर तालुक्यात विहीर व बोअरची पाणीपातळी वाढण्यासारखे पर्जन्यमान ...
पावसाळा सुरू होऊन अडीच ते तीन महिन्यांचा कालावधी लोटला असला तरी पंढरपूर तालुक्यात विहीर व बोअरची पाणीपातळी वाढण्यासारखे पर्जन्यमान झाले नाही. त्यामुळे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. पिके धोक्यात येऊ लागली आहेत. अशातच उजनी धरणाची पाणीपातळी वाढल्यामुळे शेतीसाठी पाणी सोडण्याची शेतकऱ्यांमधून मागणी जोर धरू लागली होती. याचा शासनस्तरावर विचार करून कालव्यातून शेतीसाठी पाणी सोडण्याचा सकारात्मक निर्णय घेतला आणि कालव्याला पाणी सोडले. त्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात होते. परंतु वीजबिल भरा, अन्यथा रोहित्रच बंद करण्याचा पराक्रम वीज वितरणने सुरू केला आहे. त्यामुळे कालव्यातून सोडलेले पाणी शेतीसाठी का वीजबिल वसुलीसाठी, असा सवाल शेतकऱ्यांमधून उपस्थित होत आहे.
शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रकार
रासायनिक खते, कीटकनाशके आणि मजुरीचे दर गगनाला भिडले आहेत. परंतु शेतमालासह भाजीपाला कवडीमोल भावाने विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. असे असताना रोहित्रामध्ये केवळ तेल टाकावे लागले तरीही बिल भरण्याचा अट्टाहास वीज वितरणकडून केला जातो. त्यामुळे रोहित्रामध्ये किरकोळ बिघाडापासून ते जळलेला भरण्यापासूनचा खर्च अनेकवेळा शेतकरी पदरमोड करून करणे सोयीचे समजतात. तरीही वीजबिलाच्या वसुलीसाठी रोहित्र बंद करून शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रकार केला जातोय, असा सवाल शेतकऱ्यांमधून उपस्थित होत आहे.
कोट ::::::::::::::
वीजबिल भरल्याशिवाय महावितरण चालणार नाही. परंतु सध्या शेतकरीही आर्थिक अडचणीत आहे. वीजबिल भरण्यासाठी शेतकऱ्यांना आणखी काही दिवस मुदतवाढ द्यावी, यासाठी मी प्रयत्न करीत आहे.
- बबनराव शिंदे
आमदार, माढा
कोट ::::::::::::::::::
भाजप सरकारच्या काळात कधीही शेतकऱ्यांची वीज खंडित केली नाही. कोरोनाच्या काळात शेतकरी आर्थिक अडचणीत असताना शासनाने मदत करणे गरजेचे असताना वीजबिलासाठी वीज खंडित करण्याचा चालू असलेला प्रकार चुकीचा आहे, हे त्वरित बंद करावे.
- समाधान आवताडे
आमदार, पंढरपूर-मंगळवेढा