जिल्ह्यात पाणीटंचाई; ४८ गावात टँकर सुरू, उजनीसह लघु, मध्यम प्रकल्पातील पाणीसाठ्यात घट
By Appasaheb.patil | Published: April 6, 2024 03:19 PM2024-04-06T15:19:44+5:302024-04-06T15:20:34+5:30
उजनी धरणासह लघु, मध्यम व कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यातील पाणीसाठ्यात मोठी घट झाली आहे.
आप्पासाहेब पाटील, सोलापूर: वाढत्या उन्हाबरोबरच जिल्ह्यात पाणीटंचाईचा सामना साेलापूरकरांना करावा लागत आहे. सोलापूर शहरात सहा दिवसाआड तर ग्रामीण भागात पाण्यासाठी लोकांना वणवण फिरावे लागत आहे. सध्या जिल्ह्यात आजअखेर पर्यंत ३८ गावात ४२ टँकर सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. उजनी धरणासह लघु, मध्यम व कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्यातील पाणीसाठ्यात मोठी घट झाली आहे.
राज्य शासनाने जिल्ह्यातील बार्शी माळशिरस सांगोला या तीन तालुक्यात गंभीर तर करमाळा व माढा तालुक्यात मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केलेला असून जिल्ह्यातील इतर ५५ महसुली मंडळात ही दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर केलेली आहे. या अनुषंगाने शासनाने दिलेल्या सवलतीची अंमलबजावणी करण्यात येत आहे. तसेच जिल्ह्यातील पाणी साठ्याची सद्यस्थिती उजनी धरणात वजा ३७.०९ टक्के तर सात मध्यम प्रकल्पात १०.९९ टक्के, ५६ लघु प्रकल्पात २.६८ टक्के तर ९० कोल्हापूर बंधाऱ्यात १८.६७ टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली.
दरम्यान, टँकरची मागणी आल्यानंतर तहसीलदार गटविकास अधिकारी व उपअभियंता पाणीपुरवठा यांच्या अध्यक्षतेखालील समितीने याविषयी तात्काळ निर्णय घेण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी सूचित केले आहे. जिल्ह्यातील टंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरावर टंचाई उपायोजना राबवण्यासाठी सूक्ष्म नियोजन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. जिल्हास्तरावरून तालुक्यांना देण्यात आलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी यंत्रणांकडून व्यवस्थितपणे केली जात आहे का नाही याची खात्री करण्यासाठी प्रत्येक तालुक्यात उपजिल्हाधिकारी महसूल यांनी नुकताच आढावा घेतला आहे.