पाणीटंचाई : सोलापूर शहराला तीन दिवसाआड पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 02:57 PM2018-06-14T14:57:45+5:302018-06-14T14:57:45+5:30
चिंचपूर बंधाºयात पाणी कमीच, औज बंधारा भरला: दोन महिन्यांची चिंता मिटली
सोलापूर : औज बंधारा भरल्याने शहराला तीन दिवसाआड पाणी पुरवठा करण्यास सुरूवात झाली आहे. मात्र पाटबंधारे खात्याकडून यावेळेसही चिंचपूर बंधारा अर्धवट भरून देण्यात आला आहे.
मे महिन्यात औज व चिंचपूर बंधारा कोरडा झाल्याने शहरावर जलसंकट कोसळले होते. उजनीमधून उशिरा म्हणजे २९ मे रोजी पाणी सोडण्यात आले. भीमा नदीतून १९० किलोमीटरचा प्रवास करून हे पाणी ८ जून रोजी औज बंधाºयात पोहचले. ९ जून रोजी औज बंधारा भरून चिंचपूर बंधाºयाकडे पाणी सरकले.
चिंचपूर बंधाºयाची दारे व्यवस्थित न बसविल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी अक्कलकोटकडे वाहून गेले. पाटबंधारे खात्याने धावपळ करून बंधाºयाची दारे बंद केली, पण चिंचपूर बंधारा साडेचार मीटरने भरलेला नाही. अशाही परिस्थितीत दोन महिन्यांची चिंता मिटली आहे. गेल्या आठवड्यात दोन दिवस झालेल्या पावसाने हवेत गारवा निर्माण झाल्याने पाण्याची मागणी घटली आहे.
औज बंधाºयात पाणी आल्यावर टाकळी पंपहाऊसमधील चारही पंप पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे सोमवारपासून शहराला तीन दिवसाआड पाणी पुरवठा करण्यास सुरूवात करण्यात आली आहे. हद्दवाढ विभागातील विडी घरकूल, आकाशवाणी केंद्र परिसरातही याच पद्धतीने पाणी पुरवठा व्हावा, यासाठी आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी पाणी पुरवठा विभागाच्या बैठका घेऊन नियोजन केले आहे. काही जलवाहिनीत बदल व पंपिंगची व्यवस्था केल्यामुळे या परिसरातली समस्या संपुष्टात येणार आहे.
गावठाणमध्ये बदल...
- स्मार्ट सिटी योजनेंतर्गत एबीडी एरियात (जुने गावठाण) दररोज पाणी पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. यासाठी जलवाहिनीत बदल करण्यासाठी व्हॉल्व्ह जोडणीचा ठेका देण्यात आला आहे. या कामास सुरूवात झाली आहे. पर्शिव्हल (काँग्रेस भवन) टाकीवरून जुन्या गावठाण भागात दररोज पाणी देण्यात येणार आहे.
जलवाहिनीत बदल झाल्यानंतर हा अंमल होईल. याच आधारावर महापालिकेच्या अंदाजपत्रकीय सभेत सत्ताधाºयांनी ही घोषणा केली आहे. तसेच हद्दवाढ भागात रिकाम्या असलेल्या पाच टाक्यांना जलवाहिनीचे जोड देण्याचे काम सुरू आहे. आसरा पुलाजवळील काम झाल्यावर या टाक्या भरू लागल्यावर हद्दवाढ भागात एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात येत आहे.