औज बंधार्यात सहा दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा
By Admin | Published: June 6, 2014 01:12 AM2014-06-06T01:12:28+5:302014-06-06T01:12:28+5:30
पाच टी.एम.सी. सोडण्याचा निर्णय : शहराचा पाणीपुरवठा पुन्हा विस्कळीत होणार
सोलापूर : शहराला पाणीपुरवठा होणार्या औज बंधार्यात उजनीवरून पाणी सोडण्यात न आल्याने सध्या पाच ते सहा दिवस पुरेल इतकाच साठा शिल्लक राहिला आहे. पाणी सोडण्याबाबत गुरुवारी मुंबईत मुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या बैठकीत ५ टी.एम.सी. पाणी सोडण्याचा निर्णय झाला आहे. असे असले तरी शहराचा पाणीपुरवठा पुन्हा विस्कळीत होणार असल्याचे चिन्ह दिसत आहे.
सोलापूर शहराला उजनीवरून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. त्यासाठी भीमा नदीतून औज बंधार्यात हे पाणी सोडले जाते. रोटेशन पद्धतीने दि. १ जून रोजी हे पाणी उजनी धरणातून सोडणे आवश्यक होते, मात्र तसे न झाल्याने औज बंधार्याच्या पाणी पातळीत कमालीची घट झाली आहे. सध्या मृतसाठा शिल्लक असून बंधार्यात चारी मारून पाण्याचा उपसा केला जात आहे. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी दररोज औज बंधार्यातून ५५ ते ६0 एम.एल.डी. पाण्याचा उपसा केला जातो. तसेच उजनीहून थेट पाईपलाईनने ५५ ते ६0 एम.एल.डी. पाण्याचा उपसा केला जातो. तर एकरुख (हिप्परगा) तलावातून १0 एम.एल.डी. पाण्याचा उपसा केला जातो. वास्तविक पाहता शहराला दररोज १३५ एम.एल.डी. पाण्याची आवश्यकता असताना फक्त १00 ते ११0 एम.एल.डी. पाणी प्राप्त होते. त्यामध्ये औज बंधार्यातील पाण्यावर निम्म्यापेक्षा जास्त शहराचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. असे असताना सध्या बंधार्यात पाणीच नसल्याने फक्त ५ ते ६ दिवसांचा पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. याबाबत दि. ३ जून रोजी पाटबंधारे मंत्र्यांसमवेत बैठक झाली होती; मात्र यावर निर्णय झाला नव्हता. त्यामुळे शहरासमोर पाण्याचा सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला होता.
याबाबत गुरुवारी आमदार प्रणिती शिंदे, आमदार दिलीप माने यांची जलसंपदामंत्री शशिकांत शिंदे यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत यावर चर्चा करण्यात आली; मात्र निर्णय झाला नव्हता. त्यानंतर पुन्हा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत ५ टी.एम.सी. पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. तसे आदेश जलसंपदा विभागाला देण्यात आले आहेत. हे पाणी पोहोचण्यास ८ दिवस लागणार असून शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता आहे.
------------------------------
पाणी सोडण्याचे आदेश जलसंपदा विभागाला देण्यात आले आहेत, मात्र हे पाणी ६ ते ७ हजार क्युसेक्सने सोडल्यास ते औज बंधार्यात पोहोचण्यास आठ दिवस लागतील.
- विजय राठोड
सार्वजनिक आरोग्य अभियंता