विद्युत पंप जळाल्याने मोडनिंबचा पाणीपुरवठा ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 04:15 AM2021-02-22T04:15:26+5:302021-02-22T04:15:26+5:30
मोडनिंब : गावास पाणीपुरवठा करणाऱ्या येवती तलावातील ३० अश्वशक्तीचा विद्युत पंप जळाल्याने मोडनिंबकरांना चार दिवस पाण्यापासून वंचित रहावे ...
मोडनिंब : गावास पाणीपुरवठा करणाऱ्या येवती तलावातील ३० अश्वशक्तीचा विद्युत पंप जळाल्याने मोडनिंबकरांना चार दिवस पाण्यापासून वंचित रहावे लागणार आहे.
मोडनिंब गावास येवती तालुका मोहोळ येथून पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठा केला जातो. येवती तलाव जवळ पाणी साठवण विहिरीत असणाऱ्या एकूण विद्युत पंपापैकी एक पंप जळाला. मोडनिंब ग्रामपंचायतीचे कर्मचारी येवती येथे जाऊन तो पंप विहिरीतून बाहेर काढला. त्यानंतर तपासून तो दुरुस्तीसाठी पाठवला आहे. मात्र, तो दुरुस्त होण्यासाठी दोन ते तीन दिवसाचा कालावधी लागणार असल्याने मोडनिंब गावचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे.
सध्या ग्रामपंचायत नूतन सरपंचाची निवड अद्याप झाली नाही. ही निवड २३ फेब्रुवारी रोजी होणार असल्याने नूतन सरपंचांना पाणी पुरवठ्याच्या प्रश्नाला सर्वप्रथम तोंड द्यावे लागणार आहे.
---
पर्यायी विंधन विहिरीवरुन पाणी पुरवठा
शहरात शिवाजीनगर, दत्तनगर, आदर्श नगर, संभाजीनगर, महावीर नगर, प्राथमिक आरोग्य केंद्र, अण्णाभाऊ साठे नगर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर आणि पालखी मार्ग या भागातील नागरिकांसाठी ज्यांच्याकडे विंधन विहिरी आहेत त्यांच्या माध्यमातून पाणी आणावे लागणार आहे. मोडनिंबमधील वाॅर्ड क्रमांक दोन व तीन मध्ये श्रीराम चौक ,जय भवानी चौक, शिवशक्ती चौक ,नरसिंह गल्ली, शिवाजी चौक या भागातील नागरिकांना मात्र वेताळ देवस्थान जवळ असणाऱ्या जुन्या विहिरीतून पाणी पुरवठा होणार आहे.
---
फोटो : २१ मोडनिंब
येवती तलावाजवळील मोडनिंब गावास पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीतील नादुरुस्त विद्युत पंप बाहेर काढताना ग्रामपंचायतीचे कर्मचारी