पाणीपुरवठा योजना बंद पडू लागल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:22 AM2021-04-07T04:22:57+5:302021-04-07T04:22:57+5:30
शिरभावी योजनेची तालुक्यातील ८२ पैकी ५९ ग्रामपंचायतीकडे सुमारे ७९ लाख ९३ हजार ६३३ रुपये पाणीपट्टीची थकबाकी येणे आहे. संबंधित ...
शिरभावी योजनेची तालुक्यातील ८२ पैकी ५९ ग्रामपंचायतीकडे सुमारे ७९ लाख ९३ हजार ६३३ रुपये पाणीपट्टीची थकबाकी येणे आहे. संबंधित ग्रामपंचायतीने आपल्याकडील थकबाकी भरून जीवन प्राधिकरण योजनेस सहकार्य करावे, असे आवाहन प्रभारी उपअभियंता एस. पी. कोळी यांनी केले आहे.
शिरभावी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेवर ८२ गावची पिण्याच्या पाण्याची मदार अवलंबून आहे. चालू वर्षी अतिवृष्टीचा पाऊस झाल्यामुळे ग्रामीण भागातील नद्या, नाले, ओढे, बंधारे भरून खळखळून वाहिले. त्यामुळे आत्तापर्यंत ग्रामीण पाणीपुरवठा योजना सुरू होत्या. परंतु सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढल्याने ग्रामीण पाणीपुरवठाच्या विहिरी कोरड्या पडू लागल्या आहेत. परिणामी गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागल्यामुळे शिरभावी नळपाणी पुरवठा योजनेकडे पाणी मागणी वाढू लागली आहे.
पाणीपुरवठा सुरू असलेली गावे
शिरभावी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेतून सध्या सांगोला तालुक्यातील मेथवडे, माळीवस्ती, देवळे, मांजरी, हलदहिवडी, वाकी-शिवणे, महुद, गायगव्हाण, कडलास, आगलावेवाडी, बुरंगेवाडी, राजुरी, निजामपूर, यलमर-मंगेवाडी, गोडसेवाडी, कोळे, सोमेवाडी अशा १७ गावांना त्यांच्या मागणीनुसार दैनंदिन पाणी पुरवठा सुरू आहे.
दोन महिने पुरेल इतकाच पाणीसाठा
सध्या पंढरपूर येथील इसबावी बंधाऱ्यात पुढील दोन महिने पुरेल इतकाच पाणीसाठा उपलब्ध आहे. ग्रामपंचायतीने पाणी मागणी केल्यानंतर त्या गावांना तत्काळ पाणीपुरवठा सुरू केला जात आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून योजनेच्या पाइपलाइनची तत्काळ गळती काढून पाणीपुरवठा सुरळीत केला जात आहे.