वीजपुरवठा खंडित झाल्याने सोलापूरातील पाणीपुरवठा विस्कळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 03:02 PM2018-04-20T15:02:58+5:302018-04-20T15:02:58+5:30
सोलापूर : बुधवारी व गुरूवारी सायंकाळी झालेल्या वादळी वाºयाने सोरेगाव व टाकळी येथील पंपहाऊसचा वीजपुरवठा खंडित झाल्याने गुरुवारी शहर आणि हद्दवाढ विभागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला. या समस्येमुळे शहरातील पाणीपुरवठा पुन्हा एक दिवसाने पुढे ढकलण्यात आला आहे.
बुधवारी सायंकाळी सोलापूर परिसरात वादळी वाºयासह अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. वाºयामुळे वीज वाहिन्यात अनेक ठिकाणी बिघाड झाले. गुरुवारी पहाटे दीड ते साडेतीन वाजता एक पंप अचानकपणे बंद पडला. त्यानंतर या केंद्राला वीज मंडळाकडून वीजपुरवठा होणाºया ३३ केव्ही वाहिनीच्या केबलचे जंप तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे पहाटे ४.३५ ते सकाळी ९ वाजेपर्यंत सोरेगाव जलशुद्धीकरण केंद्रातील पंप बंद पडले.
गुरुवारी दुपारी १.५0 वा. टाकळी उपसा केंद्राला वीजपुरवठा करणाºया मंद्रुप १३ मैल या दरम्यानच्या ३३ केव्ही वाहिनीचे केबल तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला. दुपारी साडेतीन वाजता दुरुस्तीनंतर ही वाहिनी सुरू झाली.
वीज वाहिन्यातील या तीन बिघाडामुळे १९ एप्रिल रोजी टाकळी व सोरेगाव केंद्रातून पाणी उपसा होऊ शकला नाही. त्यामुळे गुरुवारी शहर आणि हद्दवाढ विभागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला. या तांत्रिक अडचणीमुळे गुरुवारी ज्या भागात पाणीपुरवठा होणार होता त्या भागात आता शुक्रवारी पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे शुक्रवारी ज्या भागात पाणी सोडण्याचे नियोजन होते त्या भागाला शनिवारी आणि शनिवारी नियोजन असलेल्या भागाला रविवारी पाणीपुरवठा होणार आहे.
पाणीपुरवठा एक दिवसाने पुढे...
- गुरुवारच्या या तांत्रिक बिघाडामुळे रविवारपर्यंत शहर व हद्दवाढ विभागातील पाणीपुरवठा एक दिवसाने पुढे गेला आहे याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन प्रभारी सार्वजनिक आरोग्य अभियंता गंगाधर दुलंगे यांनी केले आहे. आगामी चार दिवस शहरात सर्वत्र पाणीपुरवठा कमी दाबाने व कमी वेळ होणार आहे.