सोलापुरात पाच दिवस नव्हे सहा दिवसाआड पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2019 12:58 PM2019-10-05T12:58:32+5:302019-10-05T13:03:49+5:30
महापालिकेकडून वीज गायब झाल्याचे कारण; ऐन सदासदीत नागरिकांची तारांबळ
सोलापूर : शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसात धो-धो पाऊस कोसळत आहे; मात्र महापालिका नियमित पाणीपुरवठा करण्यात अपयशी ठरत आहे. उजनी पंपगृहातील बिघाडामुळे शहरात पाच दिवसाआड पाणी सुरू होते. आता पुन्हा गुरुवारी वीज गायब झाल्याचे कारण पुढे करण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील अनेक भागात सहा दिवसाआड पाणी येणार आहे.
टाकळी पंपगृहाला होणारा विद्युत पुरवठा गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमाराला खंडित झाला. वीज वितरण कंपनीकडून दुरुस्तीचे काम सुरू होते. हे काम पूर्ण होण्यास बराच कालावधी लागण्याची शक्यता आहे. यामुळे टाकळी आणि सोरेगाव योजनेत पुरेशा प्रमाणात पाणी मिळणार नाही. शुक्रवारी आणि शनिवारी शहरात कमी दाबाने पाणी येणार आहे.
मागील आठवड्यात उजनी पंपगृहाचा वीजपुरवठा खंडित झाल्याचे कारण देऊन चार दिवसांऐवजी पाच दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात आला होता. पाच दिवसांचे आवर्तन अद्याप पूर्ण होत नाही तोच आता टाकळी योजनेतील वीज पुरवठा खंडित झाल्याचे कारण दिले जात आहे. या बिघाडामुळे आणखी एक दिवस पाणी उशिरा येणार आहे. शहरात सहा दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकारी वीज वितरण कंपनीकडे बोट दाखवित आहेत. वीज वितरण कंपनी सुरळीत वीजपुरवठा करीत नाहीत. बिघाड दुरुस्त करायला उशीर लावतात, असा आरोपही हे अधिकारी करीत आहेत.
अधिकाºयांचा कानाडोळा
- शहरातील अनेक भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी नगरसेवकांकडून येत आहे. महापालिकेतील पदाधिकारी निवडणुकीच्या प्रचारात गुंतले आहेत. त्यामुळे या तक्रारींकडे अधिकारी कानाडोळा करीत आहेत. उन्हाळ्याच्या सुुरुवातीला शहरात व्यवस्थित चार दिवसाआड पाणीपुरवठा होत होता. पण ऐन पावसाळ्यात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याबद्दल नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत.