डाळिंब बागा जगविण्यासाठी पावसाळ्यातही टॅँकरने पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2019 07:44 PM2019-08-21T19:44:52+5:302019-08-21T19:44:57+5:30
संगेवाडी परिसर : नीरा उजवा कालव्याचे पाणीच मिळाले नाही
सांगोला : नीरा उजवा कॅनॉलचे पाणी न मिळाल्याने संगेवाडीसह परिसरातील डाळिंब उत्पादक शेतकºयांकडून ऐन पावसाळ्यातही डाळिंब बागांना टँकरने पाणीपुरवठा करून बागा जगविल्या जात आहेत.
संगेवाडी, मांजरी, शिरभावी, धायटी, मेथवडे, देवकतेवाडी, हलदहिवडी या भागात डाळिंबाच्या बागा मोठ्या प्रमाणात आहेत. नीरा उजवा कालव्याचे पाणी उन्हाळा हंगामात मिळाले नव्हते. ऐन पावसाळ्यातही अद्याप नीरा उजवा कालव्याचे पाणी मिळाले नसल्यामुळे डाळिंब बागा सुकून जाऊ लागल्या आहेत. सांगोला तालुक्यातील सर्वात कमी पावसाची नोंद संगेवाडी मंडलमध्ये झाली आहे. यामुळे डाळिंब बागा जगविण्यासाठी शेतकºयांना विकतचे टँकरने पाणी आणून बागांना द्यावे लागत आहेत.
ज्या शेतकºयांकडे मोठी तळी आहेत, अशा शेतकºयांच्या बागा सध्या सुस्थितीत आहेत, परंतु ज्यांना शेततळी नाहीत, अशा डाळिंब उत्पादक शेतकºयांना बागा जगविणे मुश्कील बनले आहे. खडकाळ जमिनीमध्ये असलेल्या डाळिंब बागांना सतत पाणी द्यावे लागत आहे. एका छोट्या-मोठ्या टँकरसाठी शेतकरी २२०० ते २५०० रुपये देऊन विकतचे पाणी घेत आहेत. शेतकरी आपल्या शेतात छोटासा खड्डा घेऊन त्यामध्ये ते कागद टाकून टँकरचे पाणी साठवून ठेवून ते पाणी विद्युत मोटारीने बागांना देत आहेत.
टॅँकरच्या पाण्याशिवाय पर्याय नाही
- विहिरी व विंधन विहिरी कोरड्या पडल्याने शेतकºयांना सध्या बागा जगविण्यासाठी टँकरच्या पाण्याशिवाय पर्यायच राहिला नाही. काही शेतकºयांनी पाऊस पडेल या आशेवर डाळिंबाचा बहर धरला आहे. मात्र पाऊस नसल्याने या परिसरातील पशुधन छावणीवर असून बहरलेल्या बागा सुकू लागल्या आहेत. बागांना नीरा उजवा कॅनॉलचे पाणी मिळेपर्यंत जगविणे गरजेचे आहे. त्यासाठी शेतकरी ऐन पावसाळ्यातही टँकरने पाणीपुरवठा करून बागा जगविण्याचा प्रयत्न करीत आहेत.
पाऊस पडेल या आशेवर मी डाळिंबाचा बहार धरला आहे. सध्या विहीर व बोअर कोरडे पडल्याने मला कॅनॉलचे पाणी येईपर्यंत टँकरने पाणीपुरवठा करावा लागणार आहे. एका टँकरसाठी २५०० रुपये द्यावे लागत आहेत.
- सोपान खंडागळे
डाळिंब उत्पादक शेतकरी, संगेवाडी
नीरा उजवा कालव्याच्या पाण्याचे राजकारण सोडून नियमानुसार टेल टू हेड पाणी दिले असते तर या भागातील नागरिकांवर पाणीसंकट ओढवले नसते. उन्हाळ्यातही पाणी मिळाले नव्हते. सध्या तरी कॅनॉलचे लवकर पाणी सोडावे.
- आप्पासोा खंडागळे
डाळिंब उत्पादक शेतकरी