क्लोरिनमुळे खंगू लागल्या सोलापुरातील पाण्याच्या टाक्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 10:06 AM2019-04-22T10:06:59+5:302019-04-22T10:10:02+5:30
क्लोरिनच्या गॅसमुळे जलशुध्दीकरणास मदत होते. पण या गॅसमुळे पाण्याच्या टाक्या खंगत असल्याचे दिसून येत आहे.
राकेश कदम
सोलापूर : क्लोरिनच्या गॅसमुळे जलशुध्दीकरणास मदत होते. पण या गॅसमुळे पाण्याच्या टाक्या खंगत असल्याचे दिसून येत आहे. महापालिकेची जुळे सोलापुरातील दुसरी पाण्याची टाकी अशाच पध्दतीने खंगली होती. या टाकीच्या दुरुस्तीचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. जूनपर्यंत हे काम पूर्ण झाल्यास जुळे सोलापुरात आणखी १३ एमएलडी जादा पाणी साठविणे शक्य होणार आहे.
जुळे सोलापुरातील जलवितरण केंद्राच्या परिसरात जमिनीलगत १३ एमएलडी साठवण क्षमतेच्या एकूण दोन पाण्याच्या टाक्या आहेत. पाणीपुरवठा अधिकारी संजय धनशेट्टी यांनी दिलेल्या माहितीनुसार, जुळे सोलापुरातील १३ एमएलडी क्षमतेची पहिली पाण्याची टाकी १९६४ साली बांधण्यात आली तर दुसरी १३ एमएलडी क्षमतेची पाण्याची टाकी १९८५ साली बांधण्यात आली होती. क्लोरिनच्या मात्रेमुळे पहिल्या टाकीचा स्लॅब खराब झाला होता. सात ते आठ वर्षांपूर्वी त्याची दुरुस्ती करण्यात आली. अमृत योजनेतून दुसºया टाकीचा स्लॅब, पिलर्स दुरुस्तीचे काम दोन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आले. हे काम पूर्ण करण्यासाठी ठेकेदाराला दोन वर्षांची मुदत होती. त्यानुसार जून महिन्यात काम पूर्ण होईल.
जुळे सोलापूर जलवितरण केंद्रावरुन शहराच्या बहुतांश भागाला पाणीपुरवठा होतो. सोरेगाव योजनेतून येणारे पाणी थेट या टाक्यांमध्ये सोडले जाते. पाकणी येथून येणारे पाणी एका टाकीत सोडले जाते. पण पाकणीतून येणारे पाणी गावठाण भागात वितरित होत येते. या केंद्रावर सध्या केवळ एकाच १३ एमएलडी टाकीत पाणी साठविले जात आहे. या टाकीतून दोन उंचावरील टाकीत पाणी सोडले जाते. तेथून ग्रॅव्हिटीने शहराच्या विविध भागात पाणीपुरवठा होतो. दुसºया टाकीचे काम पूर्ण झाल्यास जादा १३ एमएलडी पाणी साठवण होईल. वादळ, वारा, वीज टंचाईच्या काळात साठविण्यात आलेल्या पाण्याचा उपयोग होईल.
क्लोरिनचा असाही तोटा
शहरवासीयांना जंतूविरहित पाणी मिळावे यासाठी जलवितरण केंद्रांतील पाण्याच्या टाक्यांमध्ये पिवळ्या रंगाचा क्लोरिनचा गॅस सोडण्यात येतो. या क्लोरिनच्या गॅसमुळे पाण्याच्या टाक्यांचा स्लॅब खराब होतो. स्लॅबमधील लोखंडाच्या सळया गंजतात. पत्रा आणि स्लॅबच्या खपल्या निघतात आणि त्या थेट पाण्यात मिसळतात.
कामाला गती हवी, नगरसेवकांची मागणी
उन्हाळ्यापूर्वीच महापालिका प्रशासनाने दुसºया पाण्याच्या टाकीचे काम पूर्ण करणे अपेक्षित होते. गेल्या दोन वर्षांपासून हे काम सुरू आहे. मे महिन्यात हे काम पूर्ण झाल्यास शहराला त्याचा मोठा फायदा होणार आहे. युआयडी योजनेतून साकारण्यात आलेल्या उंचावरील पाण्याच्या टाकीचे काम पूर्ण झाले आहे. या टाकीत पाणी सोडण्याची चाचणी लवकरच घेतली जाणार आहे.
पाईनलाईनलाही दणका
क्लोरिन गॅसमुळे पाण्याच्या टाक्यांसह पाईनलाईनही खराब होते. शहरातील अनेक पाईप खराब झाले आहेत़ महापालिकेचे कर्मचारी वारंवार ही यंत्रणा दुरुस्त करण्याचे काम करतात, असेही पाणीपुरवठा अधिकारी सिध्देश्वर उस्तुरगी यांनी सांगितले.