उजनीचे पाणी थांबलं, दुकानेही उघडली, सोलापूरच्या एकजुटीला पुन्हा मिळाले यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 06:56 PM2021-06-04T18:56:20+5:302021-06-04T18:56:26+5:30
‘अनलॉक’चा टप्पा : मंत्रालयात दुपारपासून पडलेली फाइल सायंकाळी ‘वर्षा’वर गेली
सोलापूर : उजनीचे पाणी इंदापूरला वळविण्याचा निर्णय सोलापूरकरांच्या एकजुटीमुळे रद्द झाला. या एकजुटीमुळेच शहरातील लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झाले आहेत. लोकसंख्या कमी असूनही सरकारने महापालिकेला स्वतंत्र प्रशासकीय घटक म्हणून मान्यता दिली. हे केवळ एकजुटीमुळेच घडले.
मुंबई, पुण्यातील बाजारपेठ सोमवार सुरू झाली. सोलापुरातील रुग्णसंख्या कमी होऊनही निर्बंध कायम राहिले. राज्य सरकारने २०११ च्या जणगणनेनुसार १० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या महापालिकांना स्वतंत्र प्रशासकीय घटक म्हणून मान्यता दिली. या निकषामध्येही सोलापूर बसत नव्हते. त्यामुळे मनपा आयुक्त पी. शिवशंकर शहरातील लॉकडाऊन कायम ठेवला. रुग्णसंख्या कमी होऊनही लॉकडाऊन कायम राहिल्याने शहरातील व्यापारी, कामगारांमध्ये संतापाची लाट उसळली. सोलापूरकरांच्या भावना आमदार संजय शिंदे, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष संतोष पवार, युवक जुबेर बागवान आदींनी तत्काळ उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या कानावर घातल्या. उजनीच्या पाण्याचा वाद नुकताच शमला असताना नवा वाद सुरू झाला होता.
अजित पवार यांनी तत्काळ मनपा आयुक्तांकडून निर्बंध उठविण्याचा विनंती प्रस्ताव मागवून घेतला. यावर पवारांनी मुख्य सचिव सीताराम कुंटे, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता यांच्यासोबत बैठक घेतली. गुप्ता यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रस्ताव मागवून घेतला. त्यानंतर मात्र सोलापूर महापालिकेला स्वतंत्र प्रशासकीय घटक म्हणून मान्यता दिली.
---पालकमंत्र्यांचीही धावपळ --
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचा विनंती प्रस्ताव बुधवारी सायंकाळी मंत्रालयात पोहोचला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापूर महापालिकेला स्वतंत्र प्रशासकीय घटक म्हणून मान्यता दिली. मात्र, यासंदर्भातील फाइल गुरुवारी सायंकाळपर्यंत मंत्रालयातच पडून होती. पालकमंत्री भरणे यांनी सायंकाळी मुख्य सचिवांना फोन केल्यानंतर फाइल मंत्रालयातच असल्याचे सांगण्यात आले. भरणे यांनी ही फाइल मंत्रालयातून वर्षा बंगल्यावर मुख्य सचिवांकडे पाठविली. मुख्य सचिवांनी अखेर यावर सही करून निर्देश दिले. अवर सचिवांनी सायंकाळी सात वाजता मनपा आयुक्तांना आदेश पाठविले. ----
शहरातील चारही दिवस आंदोलनाचे
बाजारपेठ खुली करावी यासाठी वंचित बहुजन आघाडीचे गटनेते आनंद चंदनशिवे यांनी व्यापाऱ्यांच्या एका गटाला सोबत घेऊन आयुक्तांची भेट घेतली. विरोधी पक्षनेता अमोल शिंदे, काँग्रेसचे चेतन नरोटे आक्रमकपणे पुढे आले. महापौर श्रीकांचना यन्नम यांनी पक्षीय भेद बाजूला सारून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना फोन केला. गुरुवारी आदेश येईपर्यंत महापौरांचा पाठपुरावा सुरू होता.
व्यापारी कारवाईला सामोरे गेले
माजी आमदार दिलीप माने, पार्क रोड शोरुम्स असोसिएशनचे प्रमुख केतन शहा यांनी आंदोलन उभारले. उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्य सचिवांकडे नियमित पाठपुरावा केला. या सर्वांनी मोहन बारड, हर्षल कोठारी, मोहन सचदेव, बशीर शेख, श्याम क्षीरसागर, इंदरलाल होतवानी, सुरेंद्र जोशी, चंदूभाई देढीया, सुरेश ब्रिदी, संतोष कोल्हापुरे, अमित जैन, अशोक चव्हाण, हेमंत शहा, राजू राजानी, हरीश नानकानी यांच्यासमवेत मनपासमोर आंदोलनही केले. माजी आमदार नरसय्या आडम यांनीही गुरुवारी मोठे आंदोलन केले. चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठी यांनीही निवेदनाद्वारे पाठपुरावा केला.