वन्यप्राण्यांसाठी ४५ ठिकाणी पाणवठे तयार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:21 AM2021-03-19T04:21:12+5:302021-03-19T04:21:12+5:30
पाण्याच्या शोधात वन्यप्राणी मानवी वस्तीत येण्याचे प्रमाण वाढले आहे. रस्ता ओलांडून धावताना अनेक प्राण्यांना जीव गमवावा लागत आहे. या ...
पाण्याच्या शोधात वन्यप्राणी मानवी वस्तीत येण्याचे प्रमाण वाढले आहे. रस्ता ओलांडून धावताना अनेक प्राण्यांना जीव गमवावा लागत आहे. या प्रकारांना आळा घालून जंगलातच पाण्याची सोय व्हावी, यासाठी सांगोला वनविभागाकडून तयार केलेल्या पाणवठ्यात टँकरद्वारे पाणी सोडल्यामुळे प्राण्यांची तहान भागविली जात आहे.
तालुक्यातील राजुरी, घेरडी, कोळा, पाचेगाव, कटफळ, मेडशिंगी, बागलवाडी, लोटेवाडी, य. मंगेवाडी, डिकसळ, पारे, गुणापवाडी, ह. मंगेवाडी, कटफळ, चिकमहूद, शिरभावी या ठिकाणी असलेल्या वनविभागाच्या ६ हजार ८०० हेक्टर क्षेत्रात ४५ पाणवठे तयार केले आहेत.
एका पाणवठ्यात ५ हजार लीटर पाणी मावेल, अशी त्याची रचना करून त्यात टँकरद्वारे पाणी सोडले जाते. दरम्यान, पाणवठे तयार करताना वन्य प्राण्यांना सहजपणे पाणी पिता येईल, अशी बशीच्या आकाराची रचना केल्यामुळे त्यात प्राण्यांचा बुडून मृत्यू होणार नाही, याचीही काळजी घेतली आहे.
वन्यप्राण्यांच्या हल्ल्याच्या घटनेत वाढ
तालुक्यातील वनविभागात मोर, तरस, हरीण, चिंकारा, कोल्हा, लांडगा, ससा, आदी वन्यप्राण्यांची संख्या वाढल्यामुळे जनावरांवर हल्ल्याच्या घटना वाढल्या आहेत. तसेच वनांशेजारी असलेल्या शेतातील गवत जाळल्याने त्याची झळ फॉरेस्टमधील गवताला लागत आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांच्या जीविताला धोका वाढल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी विजय बाठे यांनी सांगितले.
फोटो
१८सांगोला०१