हुडहुडी भरणाऱ्या थंडीची सोलापुरात आली लाट; दहा दिवसात सहा अंशांची घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2020 12:14 PM2020-11-11T12:14:48+5:302020-11-11T12:14:56+5:30
शहरवासीय घेताहेत शेकोट्यांची उब; सकाळी मॉर्निंग वॉक करता बाहेर पडणाऱ्यांची संख्या देखील काही प्रमाणात घटली
सोलापूर : मागील दोन ते तीन दिवसांपासून सोलापुरात थंडीची लाट सुरू झाली आहे. सायंकाळी सहानंतर तसेच पहाटे थंडीची लाट सुरू आहे. मंगळवारी किमान तापमान १३ सेल्सिअस होते.ही थंडी आणखी वाढणार आहे. सोलापूरकरांमध्ये हुडहुडी सुरू झाली असून गल्लोगल्ली शेकोट्या पेटत आहेत. गेल्या दहा दिवसात किमान तापमानात सहा सेल्सिअसची घट झाली आहे.
सकाळी मॉर्निंग वॉक करता बाहेर पडणाऱ्यांची संख्या देखील काही प्रमाणात घटली आहे. पुढील आठवड्यात ही थंडी आणखीन वाढणार असून वयोवृद्ध तसेच लहान मुलांची काळजी घ्यावी लागेल असा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे.
एक नोव्हेंबरला किमान तापमान १९.२ सेल्सिअस होते. तर कमाल तापमान ३२ सेल्सिअस होते. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासूनच तापमानात घट होताना दिसत आहे. ४ नोव्हेंबर रोजी किमान तापमान १६ सेल्सिअस होते. ९ नोव्हेंबरला किमान तापमान १४ सेल्सिअस होते. सहा व सात नोव्हेंबर रोजी किमान १५ सेल्सिअस होते.