वारीच्या वाटेवर 'ते' गोळा करतात कचरा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2018 02:31 PM2018-07-22T14:31:42+5:302018-07-22T14:32:33+5:30
लक्षावधी वारकऱ्यांनी तुडविलेल्या वारीच्या वाटेवर हरिनामाचा गजर रंगत असला तरी दैनंदिन गरजा आणि खाद्यपदार्थांच्या सेवनानंतर वारी पुढे गेल्यावर वाटेवर उरतो तो केवळ कचरा !
- गोपालकृष्ण मांडवकर
पंढरपूर : लक्षावधी वारकऱ्यांनी तुडविलेल्या वारीच्या वाटेवर हरिनामाचा गजर रंगत असला तरी दैनंदिन गरजा आणि खाद्यपदार्थांच्या सेवनानंतर वारी पुढे गेल्यावर वाटेवर उरतो तो केवळ कचरा ! मात्र आळंदीहून निघालेली एक दिंडी वारीसोबत नव्हे तर वारी मागे चालत आहे. वारकऱ्यांनी केलेला प्लॅस्टिक आणि थर्माकोलचा कचरा पोत्यात जमा करण्याची त्यांची सेवा आळंदी पासूनच सुरू आहे.
दक्षता कृती मंच आणि कमिन्स इंडिया फाऊंडेशन पुणे या माध्यमातून हे कचरामुक्त दिंडी अभियान अर्थात निसर्ग भारी 5 जुलैपासून आळंदीहून सुरू झाले आहे. या दिंडीतील वारकरी स्वच्छता दुताच्या रूपाने आहेत. त्यांच्या हातात टाळ नव्हेत तर हातमोजे आहेत.
वारीच्या मार्गावरून दिंड्या की काही तासांनी त्यांची वारी निघते. वाटेवर दिसणारे प्लॅस्टिक, थर्मोकोल तसेच वारकऱ्यांकडून झालेला अन्य कचरा ते जमा करतात, पोत्यात भरतात आणि सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस या गावाजवळ असलेल्या डॉ. कुलकर्णी यांच्या शेतातील कंपोस्ट डेपोमध्ये जमा करतात.
दररोज कचरा उचलण्यासोबतच ते पर्यावरण रक्षणाचा संदेशही नागरिकांना देत असतात. यासाठी त्यांनी वारी मार्गावरील तिन्ही विद्यापीठांची मदत घेतली आहे. प्लॅस्टिक पत्रावळी न वापरता पानांच्या पत्रावळी वापरा असा संदेश ते देतात. तसेच स्टिलची ताटे वापरून पाण्याचा अपव्यय करण्यापेक्षा निसर्गाने दिलेल्या पानांच्या पत्रावळी वापरा असा संदेश ते वारकऱ्यांना देत असतात.