जाता जाता वायचळ म्हणाले झेडपी सभेचा तो निर्णय धोकादायक; काय आहे तो निर्णय जाणून घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2020 09:12 AM2020-11-20T09:12:43+5:302020-11-20T09:13:20+5:30
ग्रामपंचायतीत गटविकास अधिकाºयाचे अधिकार काढल्यास वाढेल भ्रष्टाचार !
सोलापूर : ग्रामपंचायतीची कामे तपासण्याचा गटविकास अधिकाºयाचा अधिकार काढू नका, अन्यथा भ्रष्टाचार वाढेल अशी भीती जिल्हा परिषदेचे मावळते मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांनी गुरूवारी येथे बोलताना व्यक्त केली.
जिल्हा परिषद प्रशासनातर्फे नूतन सीईओ दिलीप स्वामी यांचे स्वागत तर मावळते सीईओ प्रकाश वायचळ यांच्या निरोपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी झेडपीचे अध्यक्ष अनिरूद्ध कांबळे होते तर याप्रसंगी समाजकल्याण सभापती संगीता धांडोरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत, चंचल पाटील, मुख्य लेखाधिकारी अजयसिंह पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव, माध्यमिक शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर, उप शिक्षणाधिकारी सुधा साळुंके उपस्थित होते.
नूतन सीईओ स्वामी यांनी प्रामाणिक व निष्ठेने काम करा, त्याचे चांगले फळ मिळते असे सांगितले. झेडपी सभेत विरोधी पक्षनेते बळीराम साठे यांनी ग्रामपंचायतीच्या कामात बीडीओ टक्केवारी मागतात असा आरोप करीत अधिकार काढण्याची मागणी केली होती. त्यानुसार सभेने ठराव केला आहे. निरोपप्रसंगी सत्काराला उत्तर देताना वायचळ यांनी या मुद्दाकडे लक्ष वेधले. ग्रामसेवक, सरपंच संघटनांनी याला विरोध केला आहे. तत्कालीन सीईओ केंद्रेकर यांनी भ्रष्टाचारावर अंकुश ठेवण्यासाठी हे परिपत्रक काढले. हे परिपत्रक मागे घेतले तर भ्रष्टाचार आणखी वाढेल, त्यामुळे हा ठराव सभेत परत पाठवावा अशी सूचना केली.
कोरोनाकाळातील कामाचे कौतुक
कोरोना साथीच्या काळात कर्मचारी व अधिकाºयांनी केलेल्या चांगल्या कामाचे वायचळ यांनी कौतुक केले. अतिरिक्त कार्यकारी अधिक़ारी गुंडे सुरूवातीला घाबरले पण नंतर भीती गेल्यानंतर त्यांनी चांगले काम केले. स्वीय सहायक अविनाश गोडसे, मल्लिकार्जुन तलवार, शिपाई तम्मेवार, आयटी विभागाचे राऊत, प्रशासन विभागाचे जगताप यांच्या कामाचे त्यांनी कौतुक केले. आरोग्याच्या खरेदीबाबत सदस्यांनी शंका व्यक्त केली आहे. त्यामुळे त्यांच्या शंकेचे निरसन करण्यासाठी चौकशी व्हायलाच पाहिजे असे सांगितले.