जगण्याचा पासवर्ड चुकतोय म्हणून आपण सारे दु:खी : चंद्रशेखर फडणीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2019 02:37 PM2019-09-05T14:37:40+5:302019-09-05T14:39:24+5:30
उद्योग बँक सेवक सांस्कृतिक मंडळ, सोलापूर तसेच रोटरी क्लब आॅफ सोलापूर एमआयडीसीच्या वतीने आयोजित बौद्धिक व्याख्यानमाला
सोलापूर : सुखी जीवनाचे अनेक चांगले पर्याय आपल्या संतांनी सांगितलेत. आपण संतांचे विचार नुसते बोलतोय पण त्यांचे विचार आचरणात आणत नाही. त्यामुळे आपल्याला वारंवार डॉक्टरांकडे जावे लागते. सध्या बहुतांश आजार हे आपल्या विचारांमुळे निर्माण होतात. मुळात आपण सारे जगण्याचा योग्य पासवर्ड चुकलोय, त्यामुळे आपण सारे दु:खी आहोत. सर्वप्रथम आपले विचार बदलणे आवश्यक आहे. पॉझिटिव्ह विचार करायला लागल्यावर आपली लाईफ स्टाईल देखील बदलेल, आनंदी जीवनाचा हा मूलमंत्र कोल्हापूर येथील वक्ते चंद्रशेखर फडणीस यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिला.
उद्योग बँक सेवक सांस्कृतिक मंडळ, सोलापूर तसेच रोटरी क्लब आॅफ सोलापूर एमआयडीसीच्या वतीने आयोजित बौद्धिक व्याख्यानमालेत फडणीस यांनी सुखी जीवनाची व्याख्या समजावून सांगितली. सुखी जीवनाचा पासवर्ड या विषयावर फडणीस यांनी व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफले. येथील निर्मलकुमार फडकुले सभागृहात व्याख्यान झाले. गुरुवारी मूळचे सोलापूरचे डीआरडीओचे ज्येष्ठ वैज्ञानिक विनायक नागेली हे बलस्यं मुलं विज्ञानम या विषयावर तिसरे पुष्प गुंफणार आहेत.
चंद्रशेखर फडणीस पुढे म्हणाले, आज अनेकांच्या घरी रोज ज्ञानेश्वरीचे पारायण चालते. ज्या घरात ज्ञानेश्वरीचे पारायण चालते त्या घरात सुखसमृद्धी असायला हवी. प्रत्यक्षात मात्र असे चित्र नाही. आज घराघरात सासू-सुनांची भांडणे कशापायी होतात?. आपण सारे अशांत, अस्वस्थ का आहोत?, याचे सखोल चिंतन होणे अपेक्षित आहे. संतांचे विचार आपण आचरणात आणत नाही. संतांनी आपल्याला व्यापक विचार करायला सांगितले. आपण संकुचित विचार करून स्वत:ची प्रगती देखील संकुचित करून घेतो, हे चुकीचे आहे. आनंदी राहण्यासाठी निगेटिव्ह विचारांपासून लांब राहा.