घरात आमची होतेय घुसमट आम्हाला हवे हक्काचे घरकुल; तृतीयपंथीयांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
By शीतलकुमार कांबळे | Published: April 28, 2023 04:08 PM2023-04-28T16:08:37+5:302023-04-28T16:09:15+5:30
ही घुसमट दूर करण्यासाठी स्वताचे घरकुल द्या, अशी मागणी तृतीयपंथीयांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे केली.
सोलापूर : एखादा माणूस तृतीयपंथी असला तर समाजच नाही तर कुटुंबियही त्याची अवहेलना करतात. आमच्यावर अनेक मर्यादा घातल्या जातात. त्यामुळे घरात राहत असूनही घुसमट होते. ही घुसमट दूर करण्यासाठी स्वताचे घरकुल द्या, अशी मागणी तृतीयपंथीयांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे केली.
तृतीयपंथीय यांच्या हक्काचे संरक्षण व कल्याण या योजनेतर्गंत शुक्रवार २८ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे जिल्हास्तरीय कार्यशाळा व मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित असललेल्या तृतीयपंथीयांनी आपल्या समस्या मांडत शासनाकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर, समाज कल्याणचे सहायक आयुक्त नागनाथ चौगुले, जिल्हा उद्योग केंद्राचे राजशेखर शिंदे, निरामय आरोग्य धाम संस्थेच्या अध्यक्षा सिमा किणीकर, क्रांती महिला संघाच्या अध्यक्ष रेणुका जाधव, दोस्ताना संघाचे आयुब शेख आदी उपस्थित होते.
महिलांना अर्धे तिकीट मग आम्हाला का नाही
राज्यातील पहिले तृतीयपंथीय सरपंच म्हणून ओळखले जाणारे माऊली कांबळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. बचत गट, बँकेचे लोनची सुविधा उपलब्ध करुन द्यावी. एसटीच्या प्रवासात महिलांना अर्ध्या तिकीटात प्रवास करण्याची सवलत तृतीयपंथीयांनाही द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.