coronavirus; इथं कामाअभावी उपाशी राहतोय; आमच्या गावाला जाऊ द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2020 12:22 PM2020-04-02T12:22:35+5:302020-04-02T12:25:55+5:30
पुणे-सोलापूर महामार्ग : सोलापूरच्या सीमेवर अडविल्यानंतर कामगारांची कळवळून विनंती
रुपेश हेळवे
सोलापूर : ‘साहेब काम मिळाले नाही तर घरी उपाशी राहतो, पण यापुढे कुठे बाहेरगावी कमवायला मात्र जाणार नाही़ आम्हाला आमच्या गावी जाऊ द्या साहेब’, अशी हात जोडून विनवणी कामानिमित्त बाहेर गेलेले कामगार सोलापूरच्या बॉर्डरवर तपासणीसाठी थांबलेल्या अधिकाºयांना करत होते़ सोलापुरात जिल्हाबंदी केल्यामुळे सोलापूरच्या सर्व बॉर्डर सील करण्यात आल्या आहेत़ यामुळे बाहेरून सोलापुरात येणाºया कामगारांना अडवून त्यांना जिल्ह्याच्या बॉर्डरवरच राहण्याची व्यवस्था करण्यात येत आहे़ यामुळे कसेही करून आपल्या मूळ गावी जाण्याचा प्रयत्न करणाºया कामगारांची मात्र मोठी अडचण होत आहे.
कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर सर्व दळणवळण सुविधा थांबल्या आहेत़ यामुळे रोजीरोटी कमवण्यासाठी मोठ्या शहरात गेलेल्या कामगारांचे मोठे हाल होत आहेत़ यामुळे हे कामगार आता आपल्या गावी जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत़ ज्यांच्याकडे दुचाकी आहेत ते दुचाकीवरून रात्रंदिवस प्रवास करुन आपले घर गाठण्याचा प्रयत्न करत आहेत़ पण ज्यांच्याकडे वाहन नाही ते मात्र आता गेल्या तीन-चार दिवसांपासून पायीच प्रवास करत आहेत़ असेच मूळ उस्मानाबाद येथील, पण कामानिमित्त मुंबई येथे गेलेल्या राठोड कुटुंबीयांना कोणतीही गाडी मिळाली नाही़ म्हणून ते शुक्रवारी सकाळी मुंबई येथून सोलापूरकडे पायी निघाले.
ते सोमवारी सकाळच्या सुमारास इंदापूरजवळ पोहोचले़ तीन दिवस ‘दिवस-रात्र’ चालत राहिल्यामुळे एका लहान मुलाला त्रास होऊ लागला़ यामुळे एका दुचाकीस्वाराला विनवणी करून लहान मुलगा आणि वडील हे गाडीवर बसून पुढे निघाले़ पण चालत जाणारे कुटुंबातील सदस्य हे मात्र मागेच राहिले़ त्या दोघांनी सोलापूर हद्दीत प्रवेश केला, पण त्यांची पत्नी आणि इतर सदस्य हे मागेच राहिले़ ते जेव्हा इंदापूरजवळील टोलनाक्यापुढे आले तेव्हा त्यांना तेथील अधिकाºयांनी अडवले आणि त्यांना पुढे पाठविण्यास नकार देत त्यांची राहण्याची व्यवस्था जवळच्या एका सभागृहात करण्यात आल्याचे सांगितले़ पण मुलगा पुढे गेला आहे, हे सांगूनही राठोड यांच्या पत्नीला पुढे पाठविले नाही, यामुळे त्यांना रडू कोसळले आणि त्या तेथील अधिकाºयांना हात जोडत विनवणी करत म्हणाल्या, ‘साहेब काम मिळाले नाही तर घरी उपाशी राहतो, पण यापुढे कुठे बाहेरगावी कमवायला मात्र जाणार नाही़ आम्हाला आमच्या गावी जाऊ द्या साहेब’़ यानंतर मात्र तेथील अधिकाºयांनी आपल्या वरिष्ठांना विचारून पुढील निर्णय घेऊ असे सांगितले़ गेल्या तीन-चार दिवसांपासून पायी प्रवास केल्यामुळे अनेकांना अशक्तपणाचा त्रास झाला़ तर काही कामगार हे चालता चालताच अनेकवेळा चक्कर येऊन पडत आहेत़ असे चालत जाणाºयांपैकी अनेक कामगारांनी आपले अनुभव सांगितले.
नाहीतर जीवाचे बरेवाईट करून घेईन...
- आपल्या पती आणि मुलापासून ताटातूट झाल्यानंतर एकटी पडलेली महिला ही मुलाला भेटण्यासाठी व्याकुळ झाली होती. पण अधिकाºयांनी त्यांना अडवून पुढे जाता येणार नाही असे सांगितले तेव्हा ती त्या अधिकाºयांना म्हणाली, मला माझ्या मुलाला भेटायचे आहे. जर त्याला भेटण्यापासून तुम्ही रोखलात तर मी येथेच जीवाचे बरेवाईट करून घेईऩ यानंतर मात्र तेथील अधिकाºयाने वरिष्ठांना विचारु न पुढचा निर्णय घेऊ असे सांगितले़
सहानुभूतीशिवाय काही मिळेना...
- ज्यांना रोज काम केल्याशिवाय आपल्या पोटाची खळगी भरत नाही अशा कामगारांना सध्या उपासमारीला तोंड द्यावे लागत आहे़ यामुळे अनेक कुटुंब हे पुणे, मुंबई येथून चालतच प्रवास करत आहेत़ अनेक कुटुंबांमध्ये लहान मुले आहेत़ बहुतांश लोकांकडे जेवणाची व्यवस्था तर नाहीच यामुळे मार्गावर जे काही मिळेल ते खात पुढे जात आहेत़ पायी जाणाºया कुटुंबामध्ये तीन ते चार वर्षांची मुलेही सोबत घेऊन ते अनवाणी प्रवास करत आहेत़ सकाळ असो वा दुपार असो ते अनवाणीच असा प्रवास सुरू ठेवत आहेत़ ज्या उन्हामध्ये आपण विनाचप्पल थांबण्याचा विचार करणार नाही तसल्या रखरखत्या उन्हामध्ये मात्र ही तीन ते चार वर्षांची मुले विनाचप्पल चालत जात आहेत़ ही परिस्थिती एका कुटुंबाची नाही तर अशा अनेक कुटुंबांची आहे़ लहान मुले भरदुपारी उन्हाचा मारा सहन करत अनवाणी चालत जाताना पाहून अनेक जण सहानुभूती दाखवून पुढे जातात़