आमचे हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले; आता जनावरांचं कसं होणार ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2020 01:22 PM2020-01-02T13:22:29+5:302020-01-02T13:25:22+5:30
सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांच्या पत्नीचा सवाल
करमाळा : आमचे ‘हे ’ झेडपी अध्यक्ष झाल्यावर गोठ्यातील जनावरांचं कसं होणार? त्यांना कोण बघणार? असा सवाल सोलापूर जिल्हा परिषदेचे नूतन अध्यक्ष अनिरूध्द कांबळे यांच्या पत्नी शुभांगी कांबळे यांनी केमचे माजी सरपंच अजित तळेकर यांच्याकडे केला होता़ जिल्हा परिषद अध्यक्ष आपले पती होणार याची माहिती कळताच त्यांनी चार दिवसांपूर्वीच माझ्याशी अशी चर्चा केल्याची माहिती खुद्द अजित तळेकर यांनी दिली.
राजकारणाची कसलीही पार्श्वभूमी नसलेले सर्वसामान्य कार्यकर्ता व शेतकरी असलेले केम येथील अनिरूध्द कांबळे हे सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बनले आहेत़ अनिरूध्द कांबळे यांचे वडील शेतकरी आहेत. ते गावपातळीवर कार्यकर्ता म्हणून काम करीत असताना केमचे माजी सरपंच अजित तळेकर यांनी माजी आ. नारायण पाटील यांना सांगून त्यांना जिल्हा परिषद गटातून प्रथमच निवडणुकीत उभे करून निवडून आणले़ आता योगायोगाने जिल्हा परिषदचे अध्यक्षपद राखीव झाल्यानंतर त्यांना आता अध्यक्ष होण्याची संधी मिळाली आहे.
अनिरूध्द कांबळे यांच्या रूपाने करमाळा तालुक्यातील ते जिल्हा परिषदचे चौथे अध्यक्ष बनले आहेत. यापूर्वी करमाळा तालुक्यातून कै. नामदेवराव जगताप, काकासाहेब निंबाळकर व कै. नारायण खंडागळे यांना संधी मिळाली होती. कै. नारायण खंडागळे २००५ मध्ये अध्यक्ष बनले होते. तब्बल १५ वर्षांनंतर करमाळा तालुक्यास पुन्हा अध्यक्षपदाची संधी मिळाली आहे.
पाटलांचा डबल धमाका..
- माजी आ. नारायण पाटील यांचे समर्थक असलेले जिल्हा परिषद सदस्य अनिरूध्द कांबळे यांची जिल्हा परिषदच्या अध्यक्षपदी व करमाळा तालुका पंचायत समितीच्या सभापतीपदावर गहिनीनाथ ननवरे व उपसभापतीपदावर दत्तात्रय सरडे यांची निवड झाली. एकाच दिवशी जिल्हा परिषद अध्यक्ष व पंचायत समितीमध्ये सभापती, उपसभापती पदावर कार्यकर्त्यांची निवड झाली़ या राजकीय घडामोडींमुळे नारायण पाटील गटाला डबल धमाका मिळाल्याची तालुक्यात चर्चा आहे़ त्यामुळे त्यांच्या समर्थकांनी जेऊर, केम, देवळाली येथे गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष साजरा केला.