आम्हाला जातीयवादी म्हणणारे आमच्या पंगतीत जेवून गेले; रावसाहेब दानवे यांचा टोला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 12:22 PM2019-03-26T12:22:56+5:302019-03-26T12:26:45+5:30
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा शरद पवार, मायावती, अब्दुल्ला यांना टोला
सोलापूर : भाजपा आणि शिवसेना जातीयवादी पक्ष असल्याचा आरोप मायावती, शरद पवार आणि फारुक अब्दुल्ला करतात. पण ही मंडळी मागील काळात आमच्या पाठिंब्याबर सत्तेत होती. जे आम्हाला जातीयवादी म्हणतात त्यांच्या तोंडाला खरकट लागलं आहे. ते आमच्या पंगतीत जेवून गेले आहेत, असा टोला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी लगावला.
सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या पदाधिकाºयांचा मेळावा येथील हेरीटेज गार्डनमध्ये झाला, यावेळी ते बोलत होते. सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, शिवसेना नेत्या नीलम गोºहे, शिवसेनेचे संपर्क प्रमुख तानाजी सावंत, भाजपाचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य, महापौर शोभा बनशेट्टी, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, आमदार प्रशांत परिचारक, ज्येष्ठ नेते रघुनाथ कुलकर्णी, भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, शिवसेनेचे जिल्हा समन्वयक शिवाजी सावंत, जिल्हा प्रमुख महेश कोठे, जिल्हाप्रमुख गणेश वानकर, माजी आमदार नरसिंग मेंगजी, भाजपाच्या प्रदेश चिटणीस उमा खापरे, सभागृह नेते संजय कोळी, पुरुषोत्तम बरडे, माजी जिल्हा परिषद सदस्य धैर्यशील मोहिते-पाटील, भाजपाचे शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी, मोहिनी पत्की, हेमंत पिंगळे आदी उपस्थित होते.
दानवे म्हणाले, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते विकासकामांवर मते मागू शकत नाहीत. त्यांच्यात तेवढी हिंमत नाही. काही लोक भाजपा-सेनेला जातीयवादी म्हणतात. त्यातील शरद पवार आमच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाले. मायावती आमच्या काळात मंत्री होत्या, तर फारुक अब्दुल्ला यांच्यासोबत आमची युती झाली होती. आम्हाला जातीयवादी म्हणणाºयांची तोंडं खरकटी आहेत. मागील निवडणुकीत महायुतीला ४२ जागा मिळाल्या होत्या. यंदा ४८ पैकी ४८ जागा मिळतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
दोन देशमुखांबद्दल बोलायचा नैतिक अधिकार नाही : देशमुख
- अनेक वर्षे सत्ता भोगूनही या शहराची काय अवस्था आहे. हद्दवाढ भागात लाईट नाही, पिण्याचे पाणी नाही. या शहराला मिळालेल्या गेल्या १५ वर्षातील आणि आमच्या पाच वर्षातील निधीचा हिशेब करायला मी तयार आहे. या जिल्ह्याला आठ लाल दिव्याच्या गाड्या होत्या. या गाड्यांमुळे जिल्ह्याचा काय फायदा झाला. या शहराचे कसे वाटोळे झाले याचे चिंतन करावे लागेल. हे आम्हाला सांगतात की दोन देशमुख काय कामाचे? यांना नैतिक अधिकार नाही, असेही सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले.