आम्ही छोटा राजनला फरफटत आणला, हे कोण राजन लागून गेले; राम शिंदे यांची टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 12:36 PM2019-04-10T12:36:37+5:302019-04-10T12:41:07+5:30
ज्यांनी मतदारांची दिशाभूल करून मतदारसंघाचे वाटोळे केले त्यांचे दिवस आता जवळ आलेत, असा इशारा सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिला.
मोहोळ : हे मोदींचे सरकार आहे. दडपशाहीची भाषा चालणार नाही. छोटा राजनला फरफटत तिहारमध्ये आणला.. किस झाड की पत्ती, ह्याचे काय.. ..हा कोण राजन लागून गेला, अशी टीका जलसंधारणमंत्री राम शिंदे यांनी माजी आमदार राजन पाटील यांच्यावर केली.
भाजप उमेदवार जयसिद्धेश्वर यांच्या प्रचारानिमित्त मोहोळ येथे भाजप-शिवसेनेच्या वतीने आयोजित केलेल्या मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सहकार मंत्री सुभाष देशमुख होते. भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गणेश वानकर, नागनाथ क्षीरसागर ,स्वाभिमानी पक्षाचे प्रदेश सरचिटणीस संतोष पाटील ,विधानसभा निवडणूकप्रमुख संजय क्षीरसागर, भाजपचे तालुका अध्यक्ष सतीश काळे, विजयराज डोंगरे, शिवानंद पाटील उपस्थित होते.
राष्ट्रवादीच्या दावणीला अनगरने बांधलेला बैल खंगून जायचा. त्याची सुटका होत नसायची, परंतु विजयराज नावाचं नवीन खोंड आता मालकाच्या पायाला कासरा बांधून त्याला चौकापर्यंत ओढत आणल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा भाजपचे जिल्हा अध्यक्ष शहाजी पवार यांनी दिला .
मोहोळ तालुका गुलामगिरीतून बाहेर
- सुभाष देशमुख म्हणाले, विजयराज डोंगरेच्या प्रवेशाने तालुका गुलामगिरीतून बाहेर आला आहे. बाबासाहेबांचे नाव घेऊन घटना तुडवणारी ही औलाद आहे. अनगरमध्ये देवाघरी गेलेले लोकसुद्धा प्रामाणिकपणे मतदानाला येतात. जिवंत मतदारांबाबत मी माहिती घेतली आहे. आत जाणारा मतदार फक्त अधिकाºयासमोर जाऊन हाताला शाई लावून माघारी येतो. बटन दाबायला तिथे वेगळीच माणसं असतात. परंतु या वेळेस ही पद्धत बंद करून तिथे सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातील. ज्यांनी मतदारांची दिशाभूल करून मतदारसंघाचे वाटोळे केले त्यांचे दिवस आता जवळ आलेत, असा इशारा देशमुख यांनी दिला.